- अंभोरा पोलिसांच्या कामगिरीचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या कडून कौतुक
कडा (प्रतिनिधी)- सोपान पगारे
दुहेरी हत्याकांडातील आठ आरोपींना अवघ्या काही तासांत जेरबंद करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिवाचे रान करून प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन केलेल्या कामगिरीचे पोलीस अधीक्षक यांनी अंभोरा पोलीस ठाण्याला भेट देऊन विशेष कौतुक केले असून लवकरच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत गुरूवारी रात्रीच्या दरम्यान दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील आठ आरोपींना ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे व त्याच्या टीमने मोठ्या शिताफीने पाठलाग करून अटक केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता प्रकरण व्यवस्थित हातळल्याने बीडचे पोलीस अधीक्षक नवनवीन कॉवत यांनी शनिवारी दुपारी अंभोरा पोलिस ठाण्याला भेट देऊन विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व पोलिसांचे कौतुक केले. त्याच बरोबर लवकरच प्रशस्तीपत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, पोलीस हवालदार, पोलीस अंमलदार उपस्थित होते.