आष्टी तहसील कार्यालयात राष्ट्रध्वज फडकताच अर्ध्यातूनच सुरू झाले राष्ट्रगीत
झालेल्या प्रकारावर तहसीलदारांकडून पडदा टाकण्याचे काम
आष्टी प्रतिनिधी :
महाराष्ट्र दिनानिमित्त आष्टी तहसील कार्यालयात आयोजित गुरुवार दिनांक एक मे 2025 रोजी सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करतेवेळी राष्ट्रगीत अर्ध्यातूनच सुरू झाल्याने आष्टी तहसील प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला. यावेळी आ. सुरेश धस देखील उपस्थित होते. दोषींवर कारवाई करण्याची सूचना आ. सुरेश धस यांनी केली असली तरी याबाबत तहसीलदार यांनी असे काही घडलेच नसल्याचे सांगत पडदा टाकण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,आष्टी तहसील प्रांगणात महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले. मात्र ध्वजारोहण करत असतानाच राष्ट्रगीताला आर्ध्यातून सुरुवात झाली. टेप रेकॉर्ड वरून हे राष्ट्रगीत अर्ध्यातूनच सुरू झाल्याने उपस्थित नागरिक काहीसे अवाक् झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी आ.सुरेश धस यांच्यासह माजी आ. साहेबराव दरेकर, शहराचे नगराध्यक्ष जिया बेग आदी मान्यवर उपस्थित होते. सदरील घटनेबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांना विचारले असता असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचे सांगत उलट पत्रकारांनी याची शहानिशा करावी असा सल्ला देत प्रकरणावर पांगरून घालण्याचा प्रयत्न केला.
➡️
🔸आ.धसांनी संबंधितांवर कारवाई करण्याच्या दिल्या सूचना
राष्ट्रगीत अर्ध्यातून सुरू झाल्याचा प्रकार तात्काळ लक्षात येताच आ.सुरेश धस यांनी घटनेचे गांभीर्य पाहून या बाबतीत हलगर्जी पणा करणाऱ्या संबंधित प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना तहसीलदार यांना दिल्या.
➡️
🔸तहसीलदार वैशाली पाटील यांनी हात झटकले
राष्ट्रगीत हे अर्ध्यातूनच सुरू झाल्याने याबाबत तहसील प्रशासनाची चूक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी या प्रकाराविषयी तहसीलदार वैशाली पाटील यांना प्रतिक्रिया विचारताच असा प्रकार घडलाच नसल्याचे सांगत तुम्हीच शहानिशा करा म्हणत हात झटकण्याचे काम केले.