प्रतिनिधी- सोपान पगारे
आष्टी तालुक्यातील वाहीरा ते पिंपळगाव दाणी हा दहा वर्षे रखडलेला रस्ता शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी सुरळीत झाला आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांच्या धाडसी आणि कार्यक्षम हस्तक्षेपामुळे हे शक्य झाले.
गेल्या दहा वर्षांपासून हा रस्ता बंद पडल्यामुळे वाहीरा गावचे शेतकरी, वाडीवस्तीतील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील लोक येणे-जाणे करताना भारी त्रास सहन करत होते. या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी वाहीरा गावचे सरपंच संभाजी गाडे आणि माजी उपसरपंच नवनाथ आटोळे यांनी तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.तहसीलदार पाटील यांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाही करून सुनावणी घेतली आणि प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. रस्त्यावर झालेली अतिक्रमणे हटवण्यासाठी ग्रामपंचायतीला आदेश दिले. नायब तहसीलदार मोहिते,नायब तहसीलदार भगीरथ धारक, ग्राम महसूल अधिकारी योगेश गोरे, मंडळ अधिकारी पखाले, तलाठी पाठक, मंडळ अधिकारी राठोड साहेब, तलाठी पावसे साहेब, आणि महसूल सेवक शरद मेटे या सर्व अधिकाऱ्यांच्या कुशल सहकार्यातून हा रस्ता रहदारीसाठी पूर्णतः मोकळा करण्यात आला.
या कार्यवाहीमुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची दहा वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. आता त्यांना शेतात जाण्यासाठी, बाजारासाठी इतर गावी जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता उपलब्ध झाला आहे. रस्ता मोकळा झाल्यामुळे आनंदीत झालेल्या ग्रामस्थांनी तहसीलदार वैशाली पाटील आणि इतर अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. “असे जनहितवादी अधिकारी समाजासाठी काळाची गरज आहे,” असे ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.