-10.6 C
New York
Sunday, January 25, 2026

Buy now

‘लाल वादळा’ची नाशिकमधून मुंबईकडे कूच

‘लाल वादळा’ची नाशिकमधून मुंबईकडे कूच

आज रविवार रोजी ही दिवसभर हे ‘लाल वादळ’ नाशिक शहरात घोंगावणार

वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

 

नाशिक –

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून किसानसभेच्या वतीने काढण्यात आलेला शेतकरी मोर्चा आज नाशिकमधून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. पिंपळनारे येथे मुक्कामी असलेला हा मोर्चा म्हसरूळ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून पुढे महामार्गाने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मोर्चाचे प्रवर्तक माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी सांगितले. त्यामुळे नाशिक शहरासह राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज रविवारी दिवसभर हे ‘लाल वादळ’ नाशिक शहरात घोंगावणार असून पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चाची वाटचाल होणार आहे. सिन्नर व त्र्यंबकेश्वरकडून येणारे आंदोलकही या मोर्चात सहभागी होणार असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मोर्चाच्या मार्गावर शहरातील वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, या आंदोलनात किसानसभा जिल्हा सचिव रमेश चौधरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव देविदास वाघ, डीवायएफआयचे जिल्हा सचिव आप्पा वटाणे यांच्यासह किसानसभा, पक्षाच्या तालुका समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

➡️ आंदोलनातील प्रमुख मागण्या

पश्चिम वाहिनी नद्यांच्या उपनद्यांवर जे.पी. सिमेंट काँक्रिटचे आदर्श बंधारे उभारून स्थानिक शेतकरी तसेच खान्देश व मराठवाड्यातील शेती. उद्योग व औद्योगिक वसाहतींसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. अपूर्ण व गाळाने भरलेले बंधारे तात्काळ पूर्ण करावेत.

वनाधिकार कायदा २००६ अंतर्गत आदिवासींच्या ताब्यात असलेली दहा एकर हक्काची जमीन त्वरित लाभधारकांना द्यावी. स्वतंत्र सातबारा तयार करून पती-पत्नीचे नाव कब्जेदार सदरी नोंदवावे.

वनप‌ट्टाधारकांना मिळालेल्या जमिनीत विहीर, जमीन सपाटीकरण, फळबाग लागवड, सोलर, मोटर यांसह केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ द्यावा. प्रलंबित फॉरेस्ट प्लॉट प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत.

शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना हमीभाव द्यावा. दोन हेक्टरपर्यंतच्या भात पिकासाठी आदिवासी विकास विभाग देत असलेल्या ४० हजार रुपयांच्या बोनसप्रमाणे वनपट्टाधारकांनाही बोनस द्यावा.

पेसा क्षेत्रातील विविध खात्यांतील नोकरभरती तात्काळ पूर्ण करावी. शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह व जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व कर्मचारी भरती करून ग्रामीण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे.

शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा.
या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

 

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या