विश्वकर्मा क्रांती दलाच्या राज्य कार्यकारिणीवर
अनिल पांचाळ यांची सर्वानुमते निवड
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
विश्वकर्मा क्रांती दल या सामाजिक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर परळी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अनिल उत्तमराव पांचाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
नागापूर येथील संत तुकाराम विद्यालयात गणित विषयाचे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनिल पांचाळ हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय आहेत. विश्वकर्मा क्रांती दलामध्ये त्यांनी विविध पदांवर कार्य करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यापूर्वी त्यांनी विश्वकर्मा जयंती उत्सव समितीचे तालुका अध्यक्ष, तसेच विश्वकर्मा कारागीर समितीचे तालुका कार्यकारी सदस्य म्हणून प्रभावी काम केले आहे.
उत्तम संघटन कौशल्य व व्यापक संपर्काच्या जोरावर त्यांच्याकडे पुढे विश्वकर्मा क्रांती दल कर्मचारी महासंघाचे राज्य समन्वयक पद सोपविण्यात आले होते. या जबाबदारीलाही त्यांनी यशस्वीपणे न्याय दिला. त्यांच्या या कार्याची दखल घेत नुकतेच त्यांना राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्तीपत्र देण्यात आले असून, मराठवाड्यातील जालना व बीड जिल्ह्याची जबाबदारी ते सांभाळणार आहेत.
अनिल पांचाळ यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, संत तुकाराम विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.









