-0.8 C
New York
Monday, February 9, 2026

Buy now

शुद्ध वैचारिकतेतून आणि आचरणातून मानवतावादाची पायाभरणी शक्य : प्रा. डॉ. म. सु. पगारे

शुद्ध वैचारिकतेतून आणि आचरणातून मानवतावादाची पायाभरणी शक्य : प्रा. डॉ. म. सु. पगारे

एरंडोल : दोन डोळे, दोन कान, एक नाक, दोन हात आणि पाय असा हाडामासांचा बनलेला माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस नव्हे. माणसाचं माणूसपण त्याच्या विचारातून आणि त्याच्या आचरणातून झळकते. शुद्ध आणि वैश्विक विचार करणारी संस्कृती आणि संस्कार जर संबंध विश्वात जर जोपासले गेले तर मानवतावादाची पायाभरणी सहज शक्य आणि सुकर होईल असे प्रतिपादन प्रा. डॉ. म.सू. पगारे यांनी केले.
दि.०८फेब्रुवारी २०२६ रोजी सूर्योदय जेष्ठ नागरिक संघ एरंडोल येथे आयोजित,प्रा.वा. ना.आंधळे यांनी अहिराणी बोलीत अनुवादित केलेल्या ‘बा,तथागता!’ या विशाल कवितेच्या ग्रंथाचे व याच ग्रंथावरील ‘विवेकी जाणिवांचा प्रज्ञा प्रवाह’ या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक व मेडिटेशन तज्ज्ञ आचार्य मनोहरजी सुरदास यांचे शुभहस्ते संपन्न झाले.त्यावेळी सुप्रसिद्ध मानवतावादी विचारवन्त,समीक्षक,साहित्यिक तथा कवी प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आपले विचार श्रोतृ समुदायासमोर मांडलेत.
ते आपल्या चिंतनातून पुढे म्हणाले की, बुद्ध तत्त्वज्ञाना तून खऱ्या अर्थाने मानवतावाद प्रस्फुटित होईल. कारण बुद्धतत्त्वज्ञानामध्ये सत्याला भिडण्यासाठीची भूमिका पहिल्यांदा घ्यावी लागते आणि सत्यान्वेषी प्रवास जीवनाच्या अखेर पर्यंत करावा लागतो. त्यासाठीची प्रत्येक माणसाची आचारसंहिता, वैचारिकता आणि माणूसपणाचे सर्व कांगोरे घासून पुसून चकचकीत करावे लागतात. शुद्ध माणूस होण्यासाठी, परिशुद्घ होण्यासाठी आणि परिशुद्घ असलेला माणूस हा खऱ्या अर्थाने मानवतावादाचा निदर्शक आहे. जात-पात, उच-नीच, काळा-गोरा या भेदांच्या भिंती संपूर्णपणे कोलमडून नव्या युगामध्ये बुद्धतत्त्वज्ञानातसह मानवतावादाची माणसापरत्वे पेरणी व्हायला हवी आणि सबंध विश्‍वच बंधुभाव, न्याय, प्रेम, स्वातंत्र्य, मैत्री, करुणा, या युक्त गुणांनी उजळून निघायला हवे. बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये ‘माणूस’ आणि माणसाचे ‘मन’ ही मानवतावादाची केंद्रवर्ती प्रयोगशाळा आहे असे म्हणता येईल. त्यासाठी मानवाच्या संस्कारक्षम मनावर वेगवेगळ्या पैलूंनी संस्कार करून मनाला परिशुद्घ करण्याचा प्रयत्न अखिल मानव जातीला खुणावत आहे. आज मितीला माणूस हे सगळे विसरत चाललेला आहे. असं दिसत असताना माणूस आणि माणूसकीची व्याख्या नव्याने करण्याची गरज भासली आहे. जगातील दुःखाचा नायनाट सुद्धा याच विचारातून करता येऊ शकतो, त्यासाठी मानवी मनाला संस्कारक्षम बनवण्याच्या अनुषंगाने परिशुद्तेकडे घेऊन जाता येईल आणि परिशुद्घ झालेले मन आपणा सर्वांना मानवतावादाचे सुखद रूप प्रकट करून देईल
यातच मानवी जीवन कल्याणाचे ध्येय लपलेले आहे.मानवतावादाच्या अनुषंगाने ‘बा, तथागता ‘ या अनुवादित साहित्यकृतीवर पावणे दोन तास चाललेल्या डॉ.पगारे यांच्या चिंतन वर्षावाने श्रोतावर्ग अक्षरशः मंत्रमुग्ध झाला.
यावेळी प्रमुख अतिथी बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक तथा मेडिटेशन तज्ज्ञ आचार्य मनोहरजी सुरदास यांनी मानवी मनाच्या अवस्थांना हात घालीत षड्रिपु पासून कशी सुटका करावी व मानवी कल्याणाच्या वाटेने कसा प्रवास करावा.,यावर प्रकाश टाकीत ‘बा,तथागता’ हे विशाल काव्य मानवी जीवनासाठी दिपस्तंभासारखे कामी येईल हा विश्वास व्यक्त करीत डॉ.पगारे यांना मूळ मराठी साहित्यकृतीचे जनक म्हणून आणि प्रा.आंधळे यांनी या साहित्यकृतीचा अस्सल अहिराणीतून अनुवाद केला म्हणून दोघा कवींचे हे ऐतिहासिक काम असून ते विश्वकल्याणकारी असल्याचे म्हणत दोन्ही कवींचे त्यांनी अभिनंदन केले.
या समारंभात समीक्षा ग्रंथासाठी लेखन करणाऱ्या समीक्षकांना शाल,समीक्षा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.त्यात डॉ.नरेंद्र बापूजी खैरनार (साक्री),डॉ.रमेश सूर्यवंशी(कन्नड),नानाभाऊ माळी(हडपसर,पुणे),डॉ. देवदत्त बोरसे(बागलाण नामपूर),कैलास पाटील(जळगाव),खेमराज पाटील(जळगाव),रमेश धनगर(गिरड-पाचोरा),डॉ.विजय शिरसाठ(चाळीसगाव),
रमेश बोरसे(धुळे),सौ.रत्ना पाटील(फागणे),डॉ.माधव कदम(नंदुरबार),डॉ. वाल्मिक अहिरे(वडजी-भडगाव),
श्रीमती लतिका चौधरी(दोंडाईचा) यांचा सहभाग होता. बा, तथागता या विशाल काव्याचे अहिराणीअनुवादक व समीक्षा ग्रंथाचे संपादक प्रा.वा. ना.आंधळे यांचा सपत्निक सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
अनुवादाची भूमिका प्रास्ताविकातून स्पष्ट करीत अतिथींचा परिचय अनुवादक व संपादक प्रा.वा. ना.आंधळे यांनी करून दिला तर संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय मनोहारी सूत्रसंचालन प्रा.खेमराज पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन कवी निंबा पुना बडगुजर यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सूर्योदय जेष्ठ नागरिक संघाचे संचालक कवी पी.जी.चौधरी सर व कवी निंबा पुना बडगुजर,विनायक कुलकर्णी,कवी झांबरे प्रा.कैलास पाटील,डॉ.दीपक खरात, कमलनाम प्रतिष्ठानचे खजिनदार दिनेशभाऊ घुगे, सौरभ घुगे यांनी अथक परिश्रम घेतले.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या