2.3 C
New York
Thursday, February 12, 2026

Buy now

महापशुधन एक्स्पो-2026 व महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर परळीत मांस व दारू विक्रीवर कडक बंदीची मागणी

*महापशुधन एक्स्पो-2026 व महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर परळीत मांस व दारू विक्रीवर कडक बंदीची मागणी*

*जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मंत्री व उत्पादन शुल्क विभागाकडे शिवकुमार केदारी यांचे ईमेलद्वारे निवेदन*

परळी वैजनाथ (वार्ताहर) :
परळी वैजनाथ हे भारताच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र ज्योतिर्लिंग असून, येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या पावन पर्वणीच्या निमित्ताने लाखो भाविक प्रभू श्री वैद्यनाथ भगवान यांच्या दर्शनासाठी येतात. संपूर्ण देशभरातील शिवभक्तांसाठी परळी वैजनाथ हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते.

याच पवित्र भूमीत दिनांक 13 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान “महापशुधन एक्स्पो-2026” (अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन) या भव्य राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे आयोजन मा. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री लोकनेत्या आदरणीय ना. पंकजाताई मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारत असून, राज्यासाठी व देशासाठी हे एक ऐतिहासिक, अभिमानास्पद व महत्त्वपूर्ण आयोजन ठरणार आहे. या प्रदर्शनामुळे परळी वैजनाथची ओळख देशपातळीवर अधिक ठळक होणार आहे.

दरम्यान, दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्रीचा पवित्र दिवस असून, दिनांक 16 फेब्रुवारी 2026 सोमवार रोजी देखील परळी शहरात दर्शन, अभिषेक, पूजन व धार्मिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. तसेच परळी शहरापासून अवघ्या 5 कि.मी. अंतरावर असलेले श्री सोमेश्वर महाराज जागृत देवस्थान हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, अनेक वर्षांपासून श्री सोमेश्वर महाराजांची पालखी परळी शहरात येत असते. त्यामुळे या काळात संपूर्ण परिसर भक्तिमय व धार्मिक वातावरणाने भारावून जातो.

या पार्श्वभूमीवर परळी शहराची धार्मिक पवित्रता, भाविकांची श्रद्धा तसेच सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 13 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत परळी शहर व परिसरात मांस विक्री, कत्तलखाने, मांस वाहतूक तसेच दारू विक्री व मद्यसेवनावर पूर्णतः कडक बंदी लागू करावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. शिवकुमार केदारी (हिंद नगर, परळी वैजनाथ) यांनी केली आहे.

यासंदर्भात श्री. शिवकुमार केदारी यांनी ईमेलद्वारे निवेदन सादर करून मा. जिल्हाधिकारी साहेब बीड, मा. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्राताई अजित पवार, मा. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री लोकनेत्या ना. पंकजाताई मुंडे साहेब, मा. आमदार धनंजय मुंडे साहेब, मा. पोलीस अधीक्षक साहेब बीड तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्याकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या कालावधीत देशभरातून पशुपालन क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी, पशुपालक, शेतकरी, नागरिक तसेच लाखो शिवभक्त परळी वैजनाथ येथे दाखल होणार आहेत. अशा वेळी शहरात मांस विक्री व मद्यविक्री सुरू राहिल्यास भाविकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असून, सामाजिक शांतता भंग पावण्याचा तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने वेळेत निर्णय घेऊन परळी शहरात धार्मिक परंपरेचा सन्मान राखावा, अशी भूमिका श्री. शिवकुमार केदारी यांनी मांडली आहे.

तसेच निवेदनात परळी शहरातील हॉटेल, ढाबे, हातगाडी, दुकाने, बार व परवाना धारक यांच्यावर प्रशासनाने विशेष पथकाद्वारे कडक नियंत्रण ठेवावे, तसेच महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष आदेश निर्गमित करावेत, अशीही स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
परळीच्या पवित्रतेसाठी निर्णय अपेक्षित
महाशिवरात्रीच्या पर्वणीला तसेच महापशुधन एक्स्पो-2026 सारख्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर परळी शहराची प्रतिमा उजळण्यासाठी प्रशासनाने मांस व मद्यविक्रीवर बंदीचे आदेश तातडीने लागू करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
श्री. शिवकुमार केदारी
हिंद नगर, परळी वैजनाथ

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या