आढाव- शेटे- बुरांडे- प्रा. फुटके- आरबुने यांचा होणार गौरव !
परळी शहर व तालुका पत्रकार संघाचे दर्पण दिन पुरस्कार जाहीर
आढाव- शेटे- बुरांडे- प्रा. फुटके- आरबुने यांचा होणार गौरव !
परळी (प्रतिनिधी)
परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिनानिमित्त दिले जाणारे विविध स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून येत्या मंगळवार, ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विशेष शासकीय विश्रामगृहात भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रानबा गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष नितीन ढाकणे, शहराध्यक्ष शेख मुकरम व सल्लागार भगवान साकसमुद्रे यांनी दिली.
दर्पण दिनाच्या निमित्ताने पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत दिवंगत ज्येष्ठ पत्रकारांच्या स्मरणार्थ दिले जाणारे स्मृती पुरस्कार यंदा मान्यवर पत्रकारांना प्रदान करण्यात येणार आहेत.
यामध्ये
—
🔹 दिवंगत मोहनलालजी बियाणी स्मृती पुरस्कार – दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार धनंजय आढाव
🔹 दिवंगत एम. पी. कणके स्मृती पुरस्कार – दैनिक परळी समाचारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार आत्मलिंग शेटे
🔹 दिवंगत प्रकाश नव्हाडे स्मृती पुरस्कार – दैनिक मराठवाडा साथीचे ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे
🔹 दिवंगत कैलास शर्मा स्मृती पुरस्कार – दैनिक सकाळचे पत्रकार प्रा. प्रवीण फुटके
🔹 दिवंगत प्रशांत जोशी स्मृती पुरस्कार – दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार धनंजय आरबुने
यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे या गौरव सोहळ्यास त्रिपुरा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाचे माजी विभाग प्रमुख, प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून पुरस्कारार्थी पत्रकारांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.
दर्पण दिन सोहळा म्हणजे पत्रकारितेतील मूल्य, निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव असल्याचे सांगत, या कार्यक्रमास परळी शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.









