सुरेश धसांच्या डुक्कर बंदोबस्ताच्या घोषणेने
पाटोद्याच्या शेतकऱ्यांना “डियर पार्क” ची आठवण
पाटोदा ( प्रतिनिधी )मला एकदा निवडून द्या मी सगळ्या राण डुकरांना मारून टाकतो” या माजी आ.सुरेश धस यांनी शिरूरच्या शेतकऱ्यांना दाखवलेल्या गाजरामुळे पाटोदा, शिरूर (तेव्हा शिरूरही पाटोदा तालुक्यातच होते) तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना सुमारे 25 वर्षापूर्वी सुरेश धस यांनी केलेल्या फुसक्या “डिअर पार्क” आंदोलन आणि घोषणेची आठवण झाली. 1999 च्या निवडणुकीत त्यांनी या आंदोलनाचे भांडवल करून निवडणूक जिंकली होती. आता त्यांनी राण डुकरांची मदत मिळवण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसते.
याबाबत वृत्त असे की, त्यावेळी आणि आताही पाटोदा, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान हरीण करीत होते आणि आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी तेंव्हाही त्रस्त होते आणि आजही त्रस्त आहेत. हाच शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय हाती घेऊन अंदाजे पंचवीस वर्षे पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चुंबळी फाटा येथे शेतकऱ्याचा मेळावा घेऊन हरणाचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरात “डियर पार्क” उभारुन पिकांचे संरक्षण करण्याची घोषणा करून आश्वासन दिले होते. एवढेच नाही तर लोकांचा यावर विश्वास बसावा यासाठी या मेळाव्याला तत्कालीन भाजप सरकार मधील केंद्रीय वनमंत्री बाबुलाल मरांडी हेही उपस्थीत करवले होते. मात्र मागची 20-25 वर्षे सतत सत्तेत असलेल्या, मंत्रीही झालेल्या माजी आ. सुरेश धस यांना या “डियर पार्क”ची साधी आठवणही राहिली नाही. मात्र ते दुसरेच डियर वाढवत गेले आहेत.
आता पुन्हा या निवडणुकीच्या निमित्ताने स्वतः आपण विकास पुरुष असल्याचे सांगून आपण कामाचा माणूस आहे म्हणून जनेतेने मला पुन्हा निवडून देण्याची मागणी करीत आहेत. तसेच त्यांनी शिरूर कासार येथे झालेल्या जाहिर सभेत बोलताना आपण शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करणाऱ्या रानडुकराचा बंदोबस्त करु म्हणुन मला विधानसभेत पाठवा मी ती मारून टाकतो असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे पाटोदा शिरूर तालुक्यातील लोकांना आता ऐन मतदानांच्या तोंडावर त्यांनी दिलेल्या “डिअर पार्क” च्या आंदोलन आणि मेळाव्याची आठवण झाली आहे आणि लोक चर्चा करत आहेत.
प्रश्न फक्त, डुकरांचा बंदोबस्त आणि डिअर पार्कचा नाही तर त्यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना मी आता “जायकवाडी चे पाणी शिरूर, पाटोदा तालुक्यात आणणार असेही आश्वासन दिले होते. गेली 21 वर्षे (दोन वर्षे वगळता) सतत सत्तेत आहेत. या पूर्वी पाटोदा तालुक्यात ही मागणी पेंटर इकबाल आदी कार्यकर्त्यांनी अनेकवेळा केली होती तेंव्हाही श्री धस यांनी कधी त्याकडे लक्ष दिले नाही किंवा एखादे पत्र त्यासाठी शासनला लिहिले नाही. आता निवडणूक आणि मतदान समोर दिसताच अशा घोषणांचा पाऊस पडू लागला आहे.
पाटोदा शहर आणि त्यातील शिवाजीनगर परिसर या परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी आतापर्यंत किती आणि कोणकोणत्या योजना आणल्या आणि किती कोटी रुपये त्यावर खर्च झाले तरी पाणी मिळाले का? हाच संशोधनचा विषय ठरु शकतो. पाटोदेकर पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर प्लान्टची मागणी कित्येक वर्षापासून करत आहेत त्याकडे केलेली डोळेझाक अक्षम्य आहे. पाटोदा येथील मांजरा नदीवरील ब्रिझ कम बंधारा योजनेचा किती आणि कसा बोजवारा उडाला हे तर संपूर्ण जिल्हा, प्रशासन आणि उच्च न्यायालय ही उघड्या डोळ्यांनी पाहून काहीही करू शकत नाही. प्रकरण कसे दडपले जाते त्यातले सहभागी कोण आणि कोणाचे समर्थक आहेत हे संपूर्ण मतदारसंघाला माहीत आहे. पाटोदा ते शंभर चिरा हा केवळ 5 की.मी. चा रस्ता, गेल्या 25 वर्षात आता पर्यंत या रस्त्यावर किती खर्च झाला? पण रस्ता कधी चांगला झाला का? झाला तर ते चांगलेपण किती दिवस टिकले? म्हणजे प्रत्येक वेळी करोडो रुपये खर्चूनही रस्त्याची दुरावस्था का दूर झाली नाही? या योजनावर खर्च झालेले पैसे कोणाच्या घशात गेले? आष्टी, पाटोदा आणि शिरूरही नगर पंचायती कोणाच्या ताब्यात आहेत? तिथे येणारा निधी कोठे आणि कसा खर्च होतो? हे शहरातील लोकांना कळत नाही असे वाटते का? पदावर बाहुले बसवून सगळा कारभार कोण करते? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कदाचित या निवडणुकीत मतदार शोधण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मान्यवरांना डिअर पार्क सारखीच डुकरांचा बंदोबस्त आणि 20 वर्षानंतर जायकवाडीचे पाणी मतदारांना दाखवावे लागत आहे. मात्र मतदार आज टाळ्या वाजवत असला आणि घोषणा देत असला तरी त्याला हे सगळे समजत नाही असे समजण्याचे कारण नाही.