ज्येष्ठ साहित्यिका डॉ. पद्मिनी कराड यांचे निधन
देहू :
ज्येष्ठ साहित्यिक, कवी डॉ. सौ. पद्मिनी कराड यांचे श्रीक्षेत्र देहू येथे दीर्घ आजारपणामुळे आज दि. ९/६/२०२५ पहाटे ४ वाजता दुःखद निधन झाले. त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आजीव सभासद होत्या व पिंपरी चिंचवड शाखेच्या काही काळ पदाधिकारी होत्या. पुरोगामी विचाराच्या प्रगतिशील शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या डॉ. पद्मिनी कराड यांचे बालपण व शालेय शिक्षण बीड येथे झाले. वैद्यकीय शिक्षण नांदेड येथे पार पडले. वैद्यकीय व्यवसायाच्या निमित्ताने त्या बीडहून पिंपरी-चिंचवड येथे स्थलांतरित झाल्या. ग्रामीण जीवन व शेतीमाती हे प्रामुख्याने त्यांच्या साहित्याचे जिव्हाळ्याचे विषय होते. त्यांचे साहित्य काल्पनिकतेपेक्षा स्वानुभवावर जास्त आधारलेले होते. त्यांनी कथा, कविता, असे विविध प्रकारचे साहित्यलेखन केलेले आहे. त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित आहेत. तसेच आत्मचरित्रपर कथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. उत्तम साहित्य लेखनाबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त आहेत. पहिला राष्ट्रीय बंधुता पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. “पहाट” या कवींच्या काव्यवाचन समूहाच्या त्या सदस्य होत्या. त्या डॉ. शिवाजीराव कराड यांच्या पत्नी व पंकज कराड तसेच शिल्पा आणि डॉ. सायली कराड यांच्या मातोश्री आहेत. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच त्यांना राजकीय व सामाजिक कार्याचीही आवड होती. भारतीय जनता पार्टीच्या त्या सक्रिय सदस्य होत्या. त्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर राजकीय क्षेत्रात काम केले होते. अलीकडच्या काळात निगडी प्राधिकरणातून स्थलांतरित होऊन देहू येथील गाथा मंदिराजवळ त्यांचे वास्तव्य होते. त्याच ठिकाणी त्यांचे निधन झाले.