आ. बबनराव लोणीकर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे बालिश बहुबायकांत बडबडला – तुळशीराम पवार
आमदार लोणीकरांनी जनतेची माफी मागावी; जनसंग्राम संघटनेची मागणी
परळी (प्रतिनिधी):
सोशल मीडियावर बसलेले चार-पाच कार्टी असतात. त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरने केलं. नरेंद्र मोदींनी सहा हजार रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले, तुझ्या मायच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहीण योजनेतून पैसे दिले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आणि तुझ्या पायातली चप्पल आमच्यामुळेच. हातातलं ते मोबाईलचं डबडं आमच्यामुळेच आहे. आमचंच घे आणि आमच्याच तंगड्या वर करतो, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. एखाद्या लोकप्रतिनिधीने असे वक्तव्य करणे म्हणजे बालिश बहुभायकांत बडबडला असेच आहे. जनसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुळशीराम पवार यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचा एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे तीव्र निषेध व्यक्त केला आहे .
जनसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुळशीराम पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमदार बबनराव लोणीकर हे सतत वादग्रस्त वक्तव्य करीत आहेत. या अगोदरही त्यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. एक जबाबदार लोकप्रतिनिधी अशा प्रकारचे वक्तव्य करत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. आमदार बबनराव लोणीकर यांनी जनतेची माफी मागावी. आपल्या वाचाळ वाणीला आळा घालावा. कारण जनता मालक आहे आणि लोकप्रतिनिधी हे जनतेचे नोकर आहेत. हे लोणीकर विसरले आहेत. जनतेचा अपमान करणारी बालीश वक्तव्य केल्यामुळे जनसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुळशीराम पवार यांनी बबनराव लोणीकर यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.