बीड : बातमीपत्र
रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली असून सर्वत्र सोशल मीडियावर याची एकच चर्चा सुरू आहे. तसेच केजचा तहसीलदार अभिजित पाटील हा देखील यात आरोपी असून तो फरार झाला आहे अशीही चर्चा शुक्रवारी रात्री सर्वत्र सुरू होती.
ही कारवाई धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री १० वाजता केली असे समजते. दरम्यान, बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सूरूच आहे. एसीबीकडूनही कारवायांचा धडाका चालूच आहे. अभिजित पाटील हा केजचा तहसीलदार आहे. मच्छिंद्र माने हा कोतवाल असून पाटील याच्यासाठी वसूलीचे काम करतो.
केज तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार पाटील याने २० हजारांची लाच मागितली होती ? अशी माहिती मिळत आहे. हीच लाच कोतवाल माने याने स्विकारली. परंतू तहसीलदार पाटील हा फरार झाल्याची चर्चा सुरू आहे. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आठवड्यातील दुसरी कारवाई बीड जिल्ह्यात केली असच म्हणावं लागेल.