‘मन करा रे प्रसन्न’ तीन दिवसीय प्रवचनमालेचे आयोजन
जाजूवाडी येथे ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे ओजस्वी प्रवचन
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी वैजनाथ तालुक्यातील जाजूवाडी येथे वै. लिंबाजी हरिभाऊ भंडारे व वै. कुसुम लिंबाजी भंडारे (अण्णा–आई) यांच्या पुण्यस्मरणार्थ भक्ती, वैराग्य व सकारात्मक जीवनदृष्टीचा संदेश देणारी तीन दिवसीय प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे.
या प्रवचनमालेत श्री संत मानकोजी महाराज बोधले यांचे ११ वे वंशज, सुप्रसिद्ध प्रवचनकार ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे ओजस्वी, प्रेरणादायी व विचारप्रवर्तक प्रवचन होणार आहे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची नवी प्रेरणा मिळणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

“मन करा रे प्रसन्न” या विषयावर आधारित ही प्रवचनमाला दिनांक ६,७ व ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री विठ्ठल मंदिर, जाजूवाडी (ता. परळी वैजनाथ) येथे संपन्न होणार आहे. ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले हे M.A., LL.B., Ph.D. (तत्त्वज्ञान) असून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात विविध संमेलने व मेळावे घेऊन समाजजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. बार्शी येथील भगवंत मंदिरात गेली २० वर्षे श्रावणमास प्रवचनमाला अखंड सुरू असून चातुर्मास काळात वेदांतशास्त्रातील ग्रंथांचे अध्यापन कार्य ते सातत्याने करीत आहेत.
श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे तत्त्वज्ञान विषयाचे अध्यापन तसेच महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानदेव–तुकाराम पुरस्कार समितीवर विश्वस्त म्हणून त्यांनी कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनातर्फे युवा सांस्कृतिक पुरस्कार २०२४ ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
देशाबाहेर दुबई येथे पहिले वारकरी कीर्तन करण्याचा बहुमान तसेच श्रीलंकेतील अशोक वाटिकेत पहिली रामकथा चिंतन करण्याचे विशेष कार्य त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देणारे आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांत त्यांची कीर्तने, प्रवचने व व्याख्याने सातत्याने सुरू आहेत. या प्रवचनमालेचे आयोजन भंडारे परिवाराच्या वतीने करण्यात आले असून, या अध्यात्मिक व प्रेरणादायी सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.









