25.6 C
New York
Saturday, June 13, 2026

Buy now

प्राचार्य पी एस ठोंबरे सर यांचा उद्या सेवापूर्ती सोहळा

*प्राचार्य पी एस ठोंबरे सर यांचा उद्या सेवापूर्ती सोहळा*

देऊळगाव (आदिनाथ ठोंबरे)
सेवापूर्ती सोहळा — एका तेजस्वी गुरुचरित्राला मानाचा मुजरा…
उद्या गर्भागिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या देऊळगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड ची पावन भूमी एका भावस्पर्शी आणि अभिमानास्पद क्षणाची साक्षीदार होणार आहे. आदरणीय पी. एस. ठोंबरे सर म्हणजेच प्रभाकर साहेबराव ठोंबरे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला हा सोहळा म्हणजे केवळ एका शिक्षकाचा निरोप नव्हे, तर एका युगप्रवर्तक शिक्षणसेवेचा गौरव सोहळा म्हणावा लागेल…
सन 1990-91 मध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय, देऊळगाव घाट येथे त्यांनी ज्ञानदानाच्या पवित्र कार्याला सुरुवात केली…आणि तब्बल 36 वर्षे आपल्या ज्ञानरूपी दीपाने असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन उजळून टाकले. देऊळगाव घाट, गहूखेल,रूईनालकोल, पाटन सांगवी,जळगाव आणि पुन्हा देऊळगाव घाट अशा विविध ठिकाणी कार्य करताना त्यांनी शिक्षणसेवेचे अखंड व्रत जपले.
ठोंबरे सर हे केवळ शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे शिल्पकार होते. त्यांच्या शिकवणीतून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध शासकीय, निमशासकीय , पोलीस, आर्मी, शिक्षक,आणि खासगी क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. अनेक नोकरदार, अधिकारी आणि समाजात मानाचे स्थान मिळवलेली व्यक्तिमत्त्वे ही त्यांच्या कर्तृत्वाची जिवंत साक्ष आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातात केवळ पुस्तक दिले नाही, तर त्यांच्या डोळ्यांत स्वप्न आणि मनात आत्मविश्वास निर्माण केला.त्यांच्या वर्गातील प्रत्येक तास हा केवळ अध्यापन नव्हता, तर तो संस्कारांचा उत्सव होता. शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम, संवेदनशीलता आणि माणुसकी यांचे धडे त्यांनी आपल्या आचरणातून विद्यार्थ्यांच्या मनावर कोरले.
शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, आष्टी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी निष्ठेने कार्य केले. देऊळगाव घाट येथे संस्थेची पायाभरणी करण्यात त्यांचे वडील स्वर्गीय साहेबराव ठोंबरे यांचे मोलाचे योगदान होते. त्या संस्कारांच्या समृद्ध वारशाला ठोंबरे सरांनी आपल्या कार्याने अधिक उंचीवर नेले. वडिलांनी लावलेल्या शिक्षणरूपी वटवृक्षाला त्यांनी आपल्या कर्तृत्वाने बहर आणला.
त्यांचा साधेपणा म्हणजे विनयशीलतेचा आदर्श, तर त्यांचा शांत स्वभाव म्हणजे संयमाचे सुंदर प्रतीक होते. विद्यार्थ्यांपासून सहकाऱ्यांपर्यंत आणि ग्रामस्थांपासून पालकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात त्यांनी प्रेम, विश्वास आणि आदराचे अढळ स्थान निर्माण केले. त्यांनी देऊळगाव घाट येथे ज्ञानेश्वर विद्यालय येथे प्राचार्य हे पद भूषवले.
उद्या होणारा हा सेवापूर्ती सोहळा म्हणजे एका प्रदीर्घ तपश्चर्येचा सन्मान आहे. शिक्षक निवृत्त होतो, पण त्याचे विचार, संस्कार आणि कार्य कधीच निवृत्त होत नाही. ठोंबरे सरांनी घडवलेली विद्यार्थ्यांची पिढी हेच त्यांच्या आयुष्याचे खरे वैभव आणि अमरत्व आहे.
ईश्वरचरणी हीच प्रार्थना — सरांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या अनुभवाचा प्रकाश समाजाला पुढेही मार्गदर्शक ठरो.
“ज्ञानाचा दीप तेवत ठेवणारे गुरु
काळाच्या प्रवाहात कधीच विसरले जात नाहीत;कारण त्यांच्या संस्कारांचा सुगंधपिढ्यान्‌पिढ्या दरवळत राहतो.”आदरणीय पी. एस. ठोंबरे सरांना सेवापूर्ती निमित्त त्रिवार अभिवादन..
त्यांचा हा सेवापूर्ती सोहळा श्री ज्ञानेश्वर विद्यालय देऊळगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड येथे 31 मे 2026 रोजी ठीक 10 वाजता या सोहळ्याचे आयोजन होणार आहे. या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ,संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे साहेब हे असणार आहेत. प्रमुख उपस्थिती ही हरिभक्त परायण भागवत महाराज उंबरेकर, आष्टीचे युवा नेते अजय धोंडे, अभय धोंडे ,वर्षाताई माळी, व गावचे सरपंच रामकिसन ठोंबरे हे असणार आहेत..

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या