जासई विद्यालयात वाढदिवसानिमित्त मधुकर पाटील यांच्या कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप
उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज,दहागाव विभाग, जासई. ता. उरण जि.रायगड. या विद्यालयात आपल्या ५९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामगार नेते मधुकर पाटील( जे.एन.पी.ए.) यांच्याकडून सामाजिक जाणिवेतून गोर-गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तरे, गणवेष, वही-पेन, शूज इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष,भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री,कामगार नेते सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा अभ्यासासाठी चांगला वापर करावा असे मनोगत व्यक्त केले.वाढदिवस मूर्ती मधुकर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या विषयी त्यांच्या या सामाजिक कार्या बद्दल सुरेश पाटील यांनी गौरवोदगार काढले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दशरथ भगत,सुधीर घर यांची विशेष उपस्थिती लाभली . विद्यालयाचे मुख्याध्यापक व रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग यांनी उपस्थित मान्यवरांचे विद्यालयामार्फत स्वागत करून देणगीदार मधुकर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानले.या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संकल्प बिल्डर ग्रुपचे मालक श्री.जरे यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी २५ हजाराची मदत केली.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे, व्हाईस चेअरमन डी.आर. ठाकूर,ज्येष्ठ सदस्य नरेश घरत ,कामगार नेते रवी घरत, डी.आर. सोनवणे वाडकर तसेच नवी मुंबई पुनर्वसन समितीचे सचिव व दि.बा.पाटील चळवळ स्पर्धेचे प्रमुख संयोजक शैलेश घाग हे प्रमुख मान्यवर आणि विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्याचे रयत सेवक संघाचे समन्वयक व दे रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक साताराचे व्हाईस चेअरमन शेख सर आणि मयुरा ठाकूर यांनी केले.तर आभार प्रदर्शन गुरुकुल प्रमुख ठाकरे एस. पी.यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली.