नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 30 हजार रमजान ईद किटचे वाटप
रमजान ईद निमित्त धनंजय मुंडेंचा अनेक वर्षांपासून उपक्रम
ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते वाटपाचा शुभारंभ
परळी वैद्यनाथ (दि. 09) – कृषिमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी रमजान ईद निमित्त सबंध परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद किटचे वाटप करण्यात येत आहे.
धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात या किट मुस्लिम बांधवांना वाटप करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मा.उपनगराध्यक्ष सुनील नाना फड, अजीज कच्ची, नितीन मामा कुलकर्णी, जावेद कुरेशी, पंडितराव झिंजुर्डे यांसह आदी उपस्थित होते.
नाथ प्रतिष्ठानच्या वतीने तब्बल 30 हजार किट वाटपासाठी आणण्यात आले असून, या प्रत्येक किट मध्ये 5 किलो आटा, एक किलो साखर, एक किलो खाद्यतेल, 200 ग्राम सुकामेवा त्यात काजू, बदाम, किसमिस, चारोळी इ. तसेच 200 ग्राम शेवया, 100 ग्राम खोबरा किस या साहित्याचा समावेश आहे.
दरम्यान आज या सर्व 30 हजार किट परळी वैद्यनाथ शहरात वार्डनिहाय तसेच मतदारसंघाच्या गणनिहाय घरपोच वाटपाची सोय करण्यात आली असल्याची माहिती नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी दिली आहे.
नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन धनंजय मुंडे यांनी सामाजिक सेवेचा वसा गेली अनेक वर्षे हाती घेतलेला आहे. या माध्यमातून विविध समाजातील सण-उत्सव साजरे करण्याची व मदत करण्याची एक अनोखी परंपरा त्यांनी जोपासली आहे. अगदी कोरोनाच्या काळात देखील धनंजय मुंडे यांनी नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत व सेवेचे कार्य कायमच अबाधित ठेवले आहे.