12.6 C
New York
Saturday, November 2, 2024

Buy now

बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या. : हरियाणा-उत्तर प्रदेशचं कनेक्शन ?

बाबा सिद्दिकींची गोळ्या झाडून हत्या. : हरियाणा-उत्तर प्रदेशचं कनेक्शन ?

मुंबई : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून गृह विभागाच्या कार्यक्षमतेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. बाबा सिद्दिकी हे या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात दाखल झाले होते. आज संध्याकाळी मुंबईच्या वांद्रे भागात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

बाबा सिद्दिकी त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयाजवळ असताना त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागली. या हल्ल्यात एक गोळी त्यांच्या सहकाऱ्यालाही पायाला लागली. यानंतर या दोघांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र, बाबा सिद्दिकींचा मृत्यू झाल्याचं आता लीलावती रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे

सिद्दिकींवर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडण्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भातला पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभाग करत असल्याची माहितीही पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.

हरियाणा-उत्तर प्रदेशचं कनेक्शन?

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली असून त्यात ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोरांबाबत त्यांनी माहिती दिली आहे. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी एक आरोपी हरियाणाचा आणि दुसरा आरोपी उत्तर प्रदेशचा असल्याचं समोर आलं आहे. त्याशिवाय, तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे उत्तर भारतातील मोठ्या गँगचा हात असल्याचा संशय आता यातून व्यक्त होऊ लागला आहे.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या