प्रेमनाथ कदम, प्रशांत जोशी आणि आता दिलीप बद्दर यांचे निधन
बातमीसाठी पत्रकार पाहिजे पण मदतीपासून पत्रकार नेहमीच वंचित
परळी /प्रतिनिधी
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पत्रकारांचा वापर करतात. शहरातील ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम, प्रशांत जोशी, आणि आता काही दिवसापूर्वी दिलीप बद्दर यांचे निधन झाले. बातम्यांसाठी पत्रकारांकडे धाव घेणारे मात्र जेव्हा पत्रकारांना मदतीची गरज असते तेव्हा मात्र नेहमीच पत्रकार वंचित राहतांना दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ,परळी शहरातील गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता करणारे दैनिक मराठवाडा साथीचा महत्त्वाचा भाग सांभाळणारे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यांच्या निधनापूर्वी दैनिक अभिमानाचे पत्रकार प्रेमनाथ कदम यांचे तर काही दिवसापूर्वीच दैनिक लोकाशाचे पत्रकार व पत्रकारिता क्षेत्रात सुमारे 30 वर्षे सेवा देणारे दिलीप बद्दर यांचे दुःखद निधन झाले. यामुळे परळी शहरातील पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाल्याचे दिसत आहे.
शहरातील पत्रकारांनी नेहमीच विविध पक्षांचे राजकीय नेते ,पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांना सदैव प्रसिद्धी देण्याचे कार्य केलेले आहे. बातम्या देण्यासाठी शहरातील सर्व पत्रकारांचा सर्वच राजकीय पक्षांनी नेहमीच वापर केलेला आहे. सर्वच पत्रकार बांधवांनी सुद्धा बातम्यांना प्रसिद्धी देऊन सहकार्य केलेले आहे.
परंतु परळी सारख्या ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना कोणत्याही पत्रकारांना ठराविक असे मानधन अथवा पगार मिळत नसतो. जे काही मिळते ते जाहिरातीच्या माध्यमातून आणि जाहिरातीतून मिळणाऱ्या कमिशनच्या माध्यमातून मिळत असते. पत्रकारिता तसे बघायला गेले तर कधीही स्थिर क्षेत्र म्हणून बघता येणार नाही. अस्थिर अशा पत्रकारितेत पत्रकार काम करत आहेत.
शहरातील पत्रकार प्रेमनाथ कदम ,पत्रकार प्रशांत जोशी, पत्रकार दिलीप बद्दर यांचे निधन झाले. परंतु त्यांच्या कुटुंबीयांना शहरातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केल्याचे दिसून येत नाही. मध्यंतरी दैनिक पार्श्वभूमीचे पत्रकार रामप्रसाद शर्मा यांचा मुलगा दोन्ही किडन्या खराब झाल्यामुळे मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला.शहरासाठी काम करणाऱ्या पत्रकारांना शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक संघटना कार्यकर्ते यांच्याकडून सुद्धा थोडी बहुत मदतीची गरज असते. परंतु ती गरज पूर्ण होताना मात्र दिसत नाही हे कटू सत्य आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणणारा शहरातील पत्रकार मदतीपासून आणि सहकार्यापासून नेहमीच उपेक्षित दिसत आहे.