सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण सध्या राज्यात चांगलंच चर्चेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी, एसआयटी यांच्याकडे आहे. सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशीही सुरु आहे. मात्र आता राज्य सरकारने या दोन्ही प्रकरणात मोठं पाऊल उचललं आहे. या दोन्ही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने दोन स्वतंत्र माजी न्यायमूर्तींची नियुक्ती केली असून, हे दोन्ही न्यायमूर्ती सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करणार आहेत.
ताहलियानी यांची नियुक्ती
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयीन एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील कसाबला फाशी दिल्याच्या प्रकरणातील न्यायाधिश एम. एल. ताहलियानी यांची त्यात नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. ताहलियानी हे आपला अहवाल सरकारला सहा महिन्यांत सादर करणार आहेत. सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे समजले जात आहे.