राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर — 31 जानेवारीपूर्वी पार पडणार
मुंबई :
राज्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतर, आज (4 नोव्हेंबर) राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत औपचारिक घोषणा केली.
राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अशा सर्व संस्थांसाठी या निवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणुकांचा अचूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुका आता मार्गी लागल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींकडून मोर्चेबांधणी, जनसंपर्क मोहीम आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तयारीचे आदेश दिले असून, प्रभाग रचना, मतदार याद्या आणि आरक्षण प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
आता राज्यातील नागरिकांच्या नजरा निवडणुकांच्या तारखा आणि संभाव्य राजकीय समीकरणांवर खिळल्या आहेत.









