पुणे, दिनांक 15 जुलै 2023 : भारताचा महत्वाकांक्षी मोहीम चांद्रयान 3 चा पहिला टप्पा यशस्वी शुक्रवारी यशस्वी झाला. चांद्रयान येत्या ५० दिवसांत आपले लक्ष्यावर पोहचणार आहे. या घटनेचा आनंद देशभर साजरा केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत त्यांचे कौतूक केले. या सर्व घटना घडत असताना पुणे येथील बालशास्त्रज्ञ रोहन भन्साळी यानेही मोठी बाजी मारली आहे.
काय केले रोहन भन्साळी याने
पुणे शहरातील विद्या व्हॅली शाळेत रोहन भन्साळी हा सहावीत शिकत आहे. त्याची निवड नासाचा कार्यक्रमासाठी झाली आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाने त्याची ‘क्युब इन स्पेस प्रोग्राम’साठी निवड केली आहे. या मोहिमेतंर्गत तळहातावर मावेल इतक्या लहान आकाराचा क्यूब अंतराळात पाठवण्यात येणार आहे. या क्यूबच्या माध्यमातून अंतराळात मानवी शरीरावर अतिनिल किरणांचा परिणाम तपासला जाणार आहे.
रोहन याची कशी झाली निवड
नासाने जगभरातील ११ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांकडून विषय मागवले होते. त्यासाठी रोहन याने अंतराळवीरांच्या शरीरावर अतीनिल किरणांचा काय परिणाम होतो? हा विषय पाठवला होता. नासाने त्याच्या विषयाची निवड करत दुसरा टप्पा सुरु केला. त्यासाठी रोहनकडे 4 बाय 3 सेमी आकाराचा क्युबिकल पाठवला. त्यात रोहन याने रेशीम, अॅल्युमिनीयम अन् प्लास्टिकचे नमूने नासाला पाठवले. आता नासा हा क्युबिकल ऑगस्टमध्ये अंतराळात पाठवणार आहे.
का राबवते नासा हा प्रोग्राम
नासाने जगभरात शास्त्रज्ञ तयार करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी 11 ते 18 या वयोगटातील विद्यार्थी पात्र ठरतात. जगभरातील विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्राची माहिती व्हावी, त्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी नासाकडून हा उपक्रम राबवला जातो. जगभरातील विद्यार्थ्यी त्यासाठी आपले संशोधन पाठवतात. लाखो विद्यार्थ्यांमधून काही जणांची निवड नासाकडून केली जाते. त्यात पुणे शहरातील रोहन भन्साळी याचा समावेश आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.