अजित पवारांची रोहित पवारांवर नाराजी
मुंबई वृत्तसंस्था :
आमदार रोहित पवार आज सकाळपासून विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला बसले होते. कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रस्तावित एमआयडीसी लवकरात लवकर मंजूर व्हावी, या मागणीसाठी रोहित पवारांनी आंदोलन केलं होतं. विधानसभेतही या मुद्द्यावर चर्चा झाली. अखेर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवारांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं.
रोहित पवार आंदोलनाला बसले असताना दुसरीकडे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख रोहित पवारांची बाजू विधानसभेत मांडत होते. “रो][
]हित पवारांनी एमआयडीसीच्या स्थापनेची मागणी गेल्या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून केली होती. तेव्हा उदय सामंतांनी अधिवेशन संपण्याआधी अध्यादेश काढण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आता दुसरं अधिवेशन आलं. तरी अजूनही तो आदेश निघालेला नाही. त्या मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत. त्याची शासनानं दखल घ्यावी”, असं अनिल देशमुख म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांनी दिली समज
दरम्यान, यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आंदोलनावरून विरोधकांना समज दिली. “त्या जागेचं पावित्र्य राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या पायऱ्यांवर आंदोलन करायचं नाही हा निर्णय सभागृहात एकमताने झाला होता. त्याबाबत आम्ही रोहित पवारांना आवाहन केलं आहे. माझी विनंती आहे की राष्ट्रवादी पक्षातल्या इतर सदस्यांनी त्यांची समजूत घालावी. रोहित पवारांनी सभागृहात येऊन आपलं म्हणणं मांडावं”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.