8.3 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

प्रशासन तयार, आता मतदारांचा प्रतिसाद आवश्यक

प्रशासन तयार, आता मतदारांचा प्रतिसाद

बीड, दि. 12 (जिमाका ):- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या 4 थ्या टप्प्यातील निवडणुक सोमवार दि. 13 मे रोजी आहे. या टप्प्यात बीड लोकसभा मतदार संघातही निवडणुका होणार आहेत. प्रशासनाच्यावतीने या मतदानासाठी संपुर्ण तयारी झालेली असून आता मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून प्रतिसाद द्यावा.

बीड लोकसभा मतदार संघात एकुण 21,42,547 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. आज सर्व विधानसभा मतदार संघतील एकुण 2355 मतदान केंद्रावरील मतदान अध्यक्ष व त्यांची टीम त्यांना निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाली. 2355 केंद्रांवर 10,432 अधिकारी कर्मचारी आपले मतदानाचे काम उद्या पार पाडतील . यामध्ये 11 दिव्यांग मतदान केंद्र , 55 महिला मतदान केंद्र, 22 युवा मतदान केंद्र चालक आहेत. याशिवाय 1 पोलिस तथा 1 होमगार्ड कर्मचारी असणार आहे. बीड विधानसभा मतदार संघात असणाऱ्या मतदान केद्रांच्या केंद्रांध्यक्षांना व चमुला जिल्हा निवडणुक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या नेतृत्वात प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तसेच निवडणुकीच्या काळात नेमलेले नोडल अधिकारी आपले कर्तव्य पार पाडीत आहे. बीड लोकसभा मतदार संघात 6 विधानसभा मतदार संघ आहे. यामध्ये 6 सहाय्यक निवडणुक अधिकारी असून 228 गेवराई या विधानसभा मतदार संघाचे ओंकार देशमुख, 229 माजलगाव चे गौरव ईंगोले, 230 बीडच्या कविता जाधव, 231 आष्टीचे प्रमोद कुदळे, 232 केजचे दिपक वजाळे, 233 परळीचे अरविंद लाटकर हे आहेत. जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन यांना करावे लागत असुन निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदान व मतमोजणी होईपर्यंत सतर्क राहणार आहेत.

अपर जिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी निवडणुकीच्या काळात अत्यंत महत्वाचे प्रशिक्षण व व्यवस्थापन तसेच अत्यंत क्लिष्ट अशा ईव्हीएम मशिन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हिव्हिपॅट यंत्रांचे सरमिसळ झाल्यानंतर विधानसभानिहाय वाटप करण्यात आले. मात्र बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची संख्या 41 पर्यंत गेल्याने अधिकचे कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हिव्हिपॅट यंत्रे मागविण्यात आलेले आहेत. या आलेल्या सीयु, बीयु व व्हिव्हिपॅट यांचे पुन्हा सरमिसळ करून विधानसभानिहाय वाटप करण्यात आले. अशा एकुण 8681 बीयु, 3317 सीयु, 3569 व्हिव्हिपॅटचे सरमिसळ झाले आहे.

आदर्श आचार संहिता कक्षाचे प्रमुख वासुदेव सोळंके यांच्याकडे लोकसभा मतदारसंघात आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे याचे कटाक्षाने नियोजन करण्यात आले. या अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कामही त्यांच्या कक्षाकडून झाले.

निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे उमेदवारांचे नामनिर्देशानाची अत्यंत महत्वाची जबाबदारी त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी चोखपणे पार पाडली. यासह त्यांच्याकडे मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्ष तथा सुक्ष्म निरिक्षण कक्ष ही जबाबदारीही सोपविण्यात आली होती. तीही ते सांभाळित आहे.

जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी भाऊसाहेब बांगर यांनी नॅशनल इन्फरमेटिक सेंटर (एन.आय.सी.) चे संकेतस्थ्ळ निवडणुकीच्या काळात दररोज अद्यावती करण्याचे काम पाहीले. निवडणुकीत उभे होणाऱ्या उमेदवारांची संपुर्ण माहिती संकेत स्थळावर अद्यावत करणे, सी-व्हीजिल ॲपवर येणाऱ्या तक्रारीं बघून विधानसभानिहाय सहाय्यक निवडणुक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन देणे व त्याचे निरसन झाल्यास त्याचे अद्यावतीकरण्याचे काम त्यांच्या चमुने पार पाडले.

उपजिल्हानिवडणुक अधिकारी महेंद्रकुमार कांबळे हे जिल्हा निवडणुक अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून एकुण निवडणुक प्रक्रियेत महत्वाचे अधिकारी आहेत. श्री. कांबळे यांनी निवडणुक प्रक्रिया योग्य पध्दतीने पार पाडावी यासाठी सुक्ष्म नियोजन केले असून मतमोजणी होईपर्यंत तसेच निकाल लागेपर्यंत त्यांची जबाबदारी राहणार आहे. यासह माहिती व्यवस्थापन, मतदार यादी कक्ष, निवडणुक कायदेविषयक कक्ष, व ऐनवेळी येणाऱ्या विषयाबाबत योग्य तो निर्णय जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या सहमतीने घेणे हे जिकिरीचे काम पार पाडीत आहे.

बीड तालुक्याचे तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी यांच्यावर निवडणुक साहित्य
स्विकृती आणि वितरण कक्ष प्रमुख म्हणून जबाबदारी होती. बीड लोकसभा मतदार संघाच्या 6 विधानसभा मतदार क्षेत्रातील 6 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, निवडणुक कर्मचारी, राजकीय उमेदवार व मतमोजणी केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी व इतर कर्मचारी यांना अधिकृत ओळखपत्र निर्गमित करण्याची अवघड कामाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

टपाली मतपत्रिका व इ.टी.पी.बी.एम.एस. तथा मतपत्रिका छपाई व वाटप पक्ष कक्षाचे प्रमुख उपजिल्हाधिकारी (सामान्य) शैलेश सुर्यवंशी यांच्यावर चौथ्या टप्प्यात बीड लोकसभा मतदार संघासह इतर दहा जिल्ह्यात मतदान होणार आहे. इतर या जिल्ह्यांमध्ये बीड जिल्ह्यातील मतदार निवडणुकीच्या कर्तव्यात असणार आहे. अशा मतदारांचे मतदान टपाली मतदानाद्वारे करून घेणे तसेच बीड जिल्ह्यात निवडणुकीच्या कामावर असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मतदान दि. 13 मे रोजी होणार आहे, अशांचे मतदान करवुन घेणे. यासह बीड जिल्ह्यातीलच 6 विधानसभा मतदार संघातील मतदार जे त्यांच्या मतदान केद्राच्या ठिकाणी नसून जिल्ह्यातील अन्य ठिकाणी कामावर आहेत त्यांचे मतदान हे काम करत असलेल्या मतदान केद्रावर मतदान करू शकणार आहेत. कुणीही मतदार सुटू नये यासाठी टपाली मतदार कक्ष कार्यरत आहे. मतदान 13 मे रोजी होणार असून त्याआधी टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ती सुव्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी श्री. सुर्यवंशी यांच्याकडे आहे.

बीड जिल्ह्यातील उप. प्रादेशिक परिवहन अधिकारी, स्वप्नील माने यांच्याकडे वाहतुक व संपर्क व्यवस्था कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. याअंतर्गत ईव्हीम मशिन सहा विधानसभा मतदार संघातील स्टॉग रुममध्ये पोहचवणे . मतदान केंद्रात असणारे मतदान केंद्र अध्यक्ष तसेच त्यांचे सहाय्यक यांना बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या यंत्रसामग्रीसह त्यांच्या मतदान केंद्रावर सुरिक्षितपणे पोहचविणे तसेच मतदान झाल्यावर मतदान यंत्रांसह विधानसभा मतदार संघांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी पोहचविण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.

हेल्प लाईन तक्रार निवारण कक्षाचे महत्वपुर्ण काम जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. सुधाकर चिंचाणे यांच्या नेतृत्वात त्यांच्या चमुने केलेले आहे. आता त्यांच्याकडे शासकीय तंत्रनिकेतन येथील स्टाँगरुम मधली ठराविक जबाबदारी सोपविलेली आहे. मतदान झाल्यानंतर त्यांची ही जबाबदारी सुरू होईल.

निवडणुकी दरम्यान उमेदवारांना विविध परवान्यांची आवश्यकता भासते. या परवान्यांची जबाबदारी नगर प्रशासन अधिकारी बाबुराव बिक्कड यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनी ती पुर्ण केली.

मतदारांमध्ये मतदानाच्या जागृतीबद्दल स्विप अंतर्गत जनजागृतीचा कार्यक्रम राबविला जातो याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. विक्रम सारुक यांच्यावर होती. त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातुन ही महत्वाची जबाबदारी पार पाडली.

मीडिया कक्षाने निवडणुकी दरम्यान प्रचार प्रसारासाठी येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणिकरण करून देण्याची जबाबदारी पार पाडली. यात आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेतली. यासह जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवडणुकीच्या संदर्भात वेळोवेळी घेतलेल्या बैठकांची माहिती माध्यमांना देण्याची महत्वाची जबाबदारी पारदर्शकपणे मीडिया कक्षाच्या प्रमुख अंजु निमसरकर व त्यांच्या चमुने पार पाडली.

निवडणुक प्रक्रियेतील आणखी एक महत्वाचा टप्पा हा भारतीय निवडणुक आयोगाकडून येणारे निवडणुक निरिक्षक कायदा सुव्यवस्था हाताळणारे पोलिस निरिक्षक तसेच खर्चाची तपासणी करणारे खर्च निरिक्षक हे वेगवेगळ्या राज्यातील वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील, पोलिस सेवेतील, महसुल सेवेतील अधिकारी येतात. निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी यांना नेमण्यात येते. त्यांना बीड लोकसभा मतदार संघातील माहिती व्हावी यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी त्यामध्ये निवडणुक निरिक्षक अजिमुल हक यांच्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोकाटे, पोलिस निरिक्षकांसाठी संजय तुपे, आणि खर्च निरिक्षकांसाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान यांची नेमणुक करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या निवडणुकीच्या कामकाजाला अधिक पारदर्शकता, मुक्त व न्यायपुर्ण निवडणुका व्हाव्यात यासाठी या निरिक्षकांची मदतच होते.

मतदानाच्या नंतर सर्वात महत्वाचे काम लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात झालेले मतदान सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी स्ट्रॉगरुम उभारली जाते. बीड मतदारसंघांची स्ट्रॉगरुम शासकीय तंत्रनिकेतन येथे आहे. या स्ट्रॉगरुम मध्ये मतमोजणी पर्यंत मतदान मशिन ठेवण्यात येणार आहे. याची विधानसभानिहाय बांधणी करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी कविता जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अधिकारी आरती तोंडे यांच्याकडे आहे. त्याचे काम पुर्ण झाले आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

मतदानाच्या दिवशी 13 मे रोजी मतदान केंद्रांवर प्रथमोपचार सोयी सुविधा पथक व वैद्यकीय पथक असावे याची संपुर्ण काळजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बडे हे घेणार आहेत.

मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगितादेवी पाटील यांची आहे. या अंतर्गत मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सुविधा, अंगणवाडीची सुविधा, व्हिलचेअरची सुविधा असणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे त्यांच्या कक्षाकडून 2355 मतदान केंद्रात केले जात आहे.

दिव्यांग मतदार मदत व सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी ए.एन. शिंदे यांना बीड लोकसभा मतदार संघात असणारे 11 मतदान केंद्रातील मुलभुत सुविधा पाहण्याची जबाबदारी तसेच इतर सामान्य मतदान केंद्रातही दिव्यांग मतदार मतदानास आल्यास त्यांना मुलभुत सुविधा मिळावी याची जबाबदारी आहे.

या निवडणुक प्रक्रियेतील आणखी एक अत्यंत महत्वाचा भाग असतो तो म्हणजे इलेक्श्न सिझर मॅनेजमेंट सिस्टम (Election Seizure Management System) यासाठी पोलिस उपअधिक्षक (गृह) विलास पाटील हे नोडल अधिकारी नेमण्यात आले असून यांच्यासह जिल्हा अग्रणि बँकेचे अधिकारी श्री. झा, राज्य उत्पादन शुल्काचे प्रशांत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने, वस्तु व सेवाकर अधिकारी सचिन जाधव, विभागीय वन अधिकारी ए. एन. काकडे, सॉफ्टवेअर सहाय्यक अभियंता विनायक भावसार हा चमु हाताळत आहे.

बीड लोकसभा मतदार संघाकरीता उमेदवार निवडणुक खर्च निरिक्षण व संनियंत्रण पथकाचे प्रमुख जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस. जी. केंद्रे हे आहेत. उमेदवारांचे लेखे तपासण्याचे अर्थपुर्ण काम त्यांच्याकडे आहे. त्यांना सहकार्य म्हणुन सहाय्यक लेखाअधिकारी जी. डी. मंदे, बी. आर. कुलकर्णी, ए.व्ही. कांबळे, श्रीमती एस. बी. खेडकर, आर.एम. भोसले, बी.के.गिरी हे आहेत.

निवडणुकीच्या काळात अनधिकृत सापडलेल्या रक्कमेसाठी कॅश रिलिज समिती नेमली जाते. या समितीमध्ये अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसिलदार (सर्वसाधारण) श्रीमती तेजस्विनी जाधव, लेखाधिकारी (अंलेप) ए.एन.अंजान, जिल्हा कोषागार अधिकारी महेश बाब्रस, आयकर अधिकारी सुदर्शन बडगमवार, विधी अधिकारी सुनिल देशमुख या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मतदानाच्या दिवशीचा चोख बंदोबस्त

लोकसभा निवडणुक 2024 अनुषंगाने बीड जिल्हयात कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त च्या दृष्टीकोनातुन पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांच्या निर्देशाप्रमाणे मतदान करिता बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अपर पोलीस अधीक्षक-02, उपविभागीय पोलीस अधिकारी- 07, पोलीस निरीक्षक -18, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक-220, पोलीस अंमलदार 3373, होमगार्ड -2194, पॅरामिलीटरी फोर्स / केंद्रिय सशस्त्र बल -07 कंपनी, दंगल नियंत्रन पथक 06, जलद प्रतिसाद पथक-02, पोलीस वाहने -273 असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बीड जिल्हयात ठिकठिकाणी नाकाबंदी, चेकपोस्ट नेमण्यात आलेले आहेत. सर्व बंदोबस्तावर पोलीस अधीक्षक बीड हे करडी नजर ठेऊन आहेत. बीड जिल्हयातील सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही समाजकंटकांनी मतदान प्रक्रियेमध्ये बाधा आणल्यास कायद्यान्वये कार्यवाही केली जाणार आहे. सदर लोकसभा निवडणुक संदर्भाने सोशल मिडीयावर सायबर सेल बीड बारकाईने लक्ष ठेऊन आहे.

मतदानासाठी प्रशासनाकडुन संपुर्ण चोख तयारी करण्यात आली असून आता मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडुन लोकशाहीने दिलेला हक्क बजवावा.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या