“आता त्यांनी ठरवायचं आहे की…”; खा. संजय राऊतांचा राज ठाकरेंना पुन्हा सवाल
मुंबई – महाराष्ट्राची लूट करणाऱ्यासोबत जायचं, मुंबई वेगळी करणाऱ्यांसोबत जायचं की महाराष्ट्र, मुंबई एकसंघ ठेवणाऱ्यासोबत राहायचे हे राज ठाकरेंनी ठरवायला हवे. आज महाविकास आघाडीची बैठक संपली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर बैठकीत सहभागी होते. अनेक गोष्टींवर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली. आम्ही मविआमध्ये वंचितचा समावेश केला असून प्रकाश आंबेडकरांकडून आलेली सूचना त्यावर नक्कीच चर्चा होईल असं संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.
संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, बैठकीत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, आम्ही आणि वंचित बहुजन आघाडीत कुठलेही मतभेद नाही. किमान समान कार्यक्रम तयार करतील त्याबाबत आंबेडकरांच्या काही सूचना आहेत. त्याचा समावेश आमच्या जाहिरनाम्यात केला जाईल. इंडिया आघाडी देशात काम करतेय. काही निर्णय हे धोरणात्मक आणि रणनीतीदृष्ट्या आहेत. आप काँग्रेसची दिल्लीत युती होतेय. तृणमूल काँग्रेस भाजपाचा पराभव करण्यास सक्षम आहे. त्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली नसली तरी त्या इंडिया आघाडीच्या आजही घटक आहेत असा दावा संजय राऊतांनी केला.