🔶ग्रामीण भागात व्यसनाधीनता पराकोटीला , गाव खेड्यात मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल !
◾️संजय नरवाडे महागाव
महागांव तालुक्यामध्ये नव तरुण युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्याचे गंभीर परिणाम समाज मनावर होत आहेत . ग्रामीण भागात पुर्वीच्या काळी बारा बलुतेदार समाज संघटितपणे काम करून शेती , वाणिज्य तसेच घरगुती कामामध्ये वापरात येणाऱ्या वस्तू बनवून उपजीविका करीत असत , कालांतराने यांत्रिकी युग आले. ग्रामीण कारागिरावर उपासमारीची वेळ आली अशिक्षित तरुण वर्ग कमी वेळात कमी श्रमात पैसा जास्त कसा मिळतो याकडे वळला असून अवैध धंद्यामध्ये वाढ होताना दिसत आहे . शेतीची काम करण्यास आजची नवीन पिढी तयार नसल्यामुळे शेती व्यवसायावर मोठे संकट घोंगावत असून असेच प्रकार पुढे चालू राहिल्यास शेती व्यवसाय बंद पडल्याशिवाय राहणार नाही . आज रोजी शेती कामाच्या मजुरी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून महिला मजुराला दिवसाला दोनशे ते अडीचशे रुपये मोजावे लागतात आणि पुरुष मजुराला चारशे ते पाचशे रुपये मोजावे लागतात . मजुरीत वाढ होऊनही काम मात्र कमी होत आहे . शेताची कामे गुत्तेदारी पद्धतीने करण्याची नवीनच टूम निघाली असून दोनशे रुपये रोजंदारीवर महिला काम करण्यास तयार नाही , पुरुषांचे तेच धोरण असून गुत्तेदारी किंवा ठरवून काम करण्याच्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून मजूर नसल्यामुळे दुधाळ जनावरांचे प्रमाण कमी होऊन देशी गाई , म्हशी यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून शेणखत किंवा तत्सम शेती पूरक निविष्ठा तयार होत नाहीत . आज प्रत्येक गाव खेड्यात मजूर मिळत नसल्यामुळे तरुण वर्ग दारूच्या गुत्यावर दिवसभर बसून राहतात महिलांच्या मजुरीवर राशन आणून भागवायच थोडेफार गावात मिळेल ते बिगारी काम करून व्यसन भागवायच काम तरून करताना दिसत आहेत . साहजिकच अवैधरीत्या रेती चोरी , अवैध वृक्षतोड , गौण खनिज चोरी , घरफोड्या , रोड रॉबरी यामध्ये वाढ होऊन समाजामध्ये आरजता पसरविण्याची काम व्यसनाधीनता करीत आहे . शासन स्तरावर पूर्वी दारूबंदी व्यसन बंदी याकरिता समाजाचे प्रबोधन करण्याचे कार्यक्रम होत असत , आत्ताच्या काळामध्ये सरकारच महसूल वाढीसाठी दारू उद्योगाला प्रोत्साहन देत आहे . ऑनलाइन सट्टा , मुंबई कल्याण सट्टा , रमी डॉट कॉम , कोंबड बाजार यामध्ये प्रत्येक खेड्यात नंगानाच चालू असून येणाऱ्या काळात शेतीची कामे कोणीच करणार नाही अशी परिस्थिती निर्माण होत असून शेतकऱ्यांना शेती उद्योगावरची अवकाळा उघड्या डोळ्यांनी निमूट पाहण्याशिवाय पर्याय नाही . गांव , खेडे , तांडा वस्ती , वाड्यावर गावठी दारूचा महापूर वाहत असून प्रशासन हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे . चिरीमिरी वरकमाई साठी संपूर्ण गाव उध्वस्त करण्याचं पातक महसूल आणि पोलीस प्रशासन बीट जमादार करीत आहेत . खेड्यामध्ये महिलांनी दारूबंदीसाठी आवाज उठविल्यास , आंदोलन केल्यास ते दडपून टाकण्याचे काम दारू व्यावसाईक आपल्या पंटरला हाताखाली घेवून करतात .शासन जोपर्यंत कठोर कारवाई करू गाव खेड्यातील दारूबंदी करणार नाही तोपर्यंत अवैध धंदे चोरी लबाडी व्यसनाधीनता बंद होणार नाही . खेड्यातील मजुरांची पळवा पळवी ठेकेदार लोक करीत असून वीट भट्ट्या बांधकाम तसेच शहरातील मोठ्या कारखान्यात खेड्यातील मजुरांची रवानगी होताना दिसत असून मुंबई , पुणे , औरंगाबाद तसेच परराज्यात सुद्धा मजूर कामाला जात असून स्थानिक शेतकऱ्यांना आणि बाजारपेठेतील व्यावसायिकांना मजूर मिळत नसल्यामुळे आपली व्यवसाय बंद करावे लागत आहेत . शासनाने रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना मजुरांचा पुरवठा केल्यास यावर थोडाफार प्रभाव पडू शकतो , शेतीमध्ये राखणदारी , सालदारी , महीनदारी महिनेवारी ह्या पूर्वीच्या प्रथा बंद होऊन शेतीच्या बांधावर मजूर वर्ग जाण्यास तयार नसल्यामुळे येणाऱ्या काळात पैसे हातात घेऊन गावभर फिरले तरी तुम्हाला मुठभर धान्य मिळणार नाही ? मोबाईलच्या जमान्यात तरुण वर्ग पिसाळला असून एक वर्षाचं बाळ सुद्धा हातात मोबाईल दिल्या शिवाय रडण्याचे थांबत नाही किंवा खेळताना दिसत नाही समाज मनावर चैनीच्या वस्तू आणि व्यसनामुळे खोलवर परिणाम होताना हतबल होऊन पाहण्याची वेळ ज्येष्ठ नागरिकावर आली आहे .