कुणीही ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे परत घेऊ शकत नाही : अजित दादा पवार
लाडकी बहीण योजना, अजित पवारांनी केलं स्पष्ट !
🔷 लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार असल्याच्या विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलं
मुंबई : वृत्तसंस्था
लाडकी बहीण योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हेल्पलाईन (NCP Helpline) क्रमांक सुरु केला आहे. योजनांबद्दल महिलांना माहिती नसते, त्यामुळे हेल्पलाईन नंबर सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आम्ही जन सन्मान यात्रा घेऊन फिरत असून आतापर्यंत 22 मतदारसंघात आम्ही गेलो, पुढेही आम्ही जाणार अशी माहिती अजित पवारांनी दिली. दरम्यान यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार असल्याच्या विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलं. दिलेली ओवाळणी कोणी परत घेतं का? अशी विचारणा करत त्यांनी हा दावा फेटाळला.
“जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी अनेक महिलांना झिरो बॅलेन्सवर खातं सुरु करुन दिलं आहे. त्यांना पैसे मिळाले असून त्यांनी ते काढूनही घेतले आहेत. मात्र काही राष्ट्रीयकृत बँकांसंबंधी तक्रार आली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधील भाषणात आम्ही जी ओवाळणी दिली आहेत त्यात कोणतीही काटछाट होणार नाही असं सांगितलं आहे. राष्ट्रीयकृत बँकांना यासंदर्भात सूचना दिल्या जाणार आहेत. जुनं कर्ज असेल तर याचा त्याच्याशी काही संबंध नसेल,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.
आतापर्यंत 10 हजार समस्यांचे निरसन करण्यात आले आहे. मी काम करत असताना जात धर्म बघत नाही. लाभार्थी हा एकच जात आणि धर्म आहे. या योजनांमध्ये आम्ही सगळ्यांना सामावून घेतले आहे. कुठल्याही घटकाला आम्ही सोडले नाही,” असंही त्यांनी सांगितलं.