दिल्ली – वृत्तसंस्था
—————————–
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज 26 डिसेंबर रोजी निधन झालं आहे. प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी सायंकाळी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मनमोहन सिंग 92 वर्षांचे असून त्यांची प्रकृती खालावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
22 मे 2004 रोजी मनमोहन सिंग हे देशाचे 13 वे पंतप्रधान बनले होते. त्यानंतर ते सलग दहा वर्षं देशाचे पंतप्रधान राहिले.
केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान. डॉ सिंग यांचा देशाच्या आर्थिक आणि राजकीय विश्वातील प्रवास हा थक्क करणारा आहे.
मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.