एक वही एक पेन अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल- हभप शामसुंदर सोन्नर
परळी प्रतिनिधी एक वही एक पेन हे अभियान वंचित, उपेक्षित राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहे. असे प्रतिपादन विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी केले. ते परळी येथे एक वही एक पेन अभियान अंतर्गत संत धुराबाई आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना सदर साहित्य वाटप कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त युवा पत्रकार-अभिनेता विकास वाघमारे आणि सामाजिक कार्यकर्ते विकास रोडे यांनी परळी येथील संत धुराबाई आदर्श प्राथमिक आश्रम शाळेत ‘एक वही एक पेन’ अभियान राबवुन शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी बोलतान ह. भ. प. शामसुंदर सोन्नर म्हणाले की,एक वही एक पेन अभियान वंचीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवेल.तसेच भारतात शिक्षणातून विद्यार्थी गळतीचे प्रमाण प्रचंड आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे सरकारला प्रभावीपणे शक्य होत नाही. त्याकरिता अनेक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार हा पालक वर्ग असलेला विद्यार्थी आम्ही शैक्षणिक सुविधा अभावी हिरमुसून जाताना अनुभवला आहे.अशा परिस्थितीत ‘एक वही एक पेन’ अभियान बाबासाहेबांचे उच्चशिक्षित समाजाचे स्वप्न पूर्ण करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
ज्ञान देण्याचा आणि ज्ञान घेण्याचा जो अधिकार सीमित, मर्यादित ठेवण्यात आला होता, ती कोंडी फोडण्याचे काम नामदेव महाराजांनी आणि संत चोखामेळा यांचे सुपुत्र संत कर्ममेळा यांनी वारकरी कीर्तन पद्धतीच्या माध्यमातून केले. असे प्रतिपादन पत्रकार आणि कीर्तनकार ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण ‘एक वही व एक पेन’ अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थी शिक्षित होतील. आयुष्यात मोठ्या पदांवर विराजमान होतील. असा आशावाद प्रख्यात सिने नाटय दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी व्यक्त केला. भारताच्या सर्व सामाजिक दुखण्यांवर शिक्षण हेच प्रभावी औषध असेल असे स्वता: डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहेत.या अभियानास आपण सहकार्य करू असे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी दिले.
संत धुराबाई आश्रम शाळेत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, लेखक, दिग्दर्शक, प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे, मुफ्टा शिक्षक संघटनेचे नेते भैय्यासाहेब आदोडे, ह. भ. प. गोविंद महाराज मुंडे डॉ. आकाश वाघमारे उपस्थित होते.
कार्यक्रमास पोलीस कर्मचारी रुपेश शिंदे, पत्रकार संभाजी मुंडे, पत्रकार दत्ता काळे, पत्रकार धनंजय आढाव, पत्रकार महादेव शिंदे, मुख्याध्यापक वसंत राठोड, विठ्ठलराव झिलमेवाड, ओम प्रकाश शिंदे, विनायक काळे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ दाणे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बा.सो. कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन शिवकुमार तुपकर यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.