राळेगाव तालुक्यात एम. आय. डी. सी. व कापूस प्रक्रिया उद्योग देण्याची मागणी
( बाळू धुमाळ यांनी ना. अजित पवार यांना दिले निवेदन)
चेतन वर्मा : राळेगाव प्रतिनिधी
शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतकरी, कष्टकरी जनतेचे वास्तव असणारा राळेगाव तालुका, या तालुक्यात एम. आय. डी. सी. व कापूस प्रक्रिया उद्योग मंजूर करून शेतकरी बांधवाच्या शेतमालाला योग्य बाजारभाव, व बरोजगारांच्या हाताला कामं देण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट ) तालुकाध्यक्ष शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी या मागणीचे निवेदन दिले. नागपूर येथे अधिवेशनादरम्यान विदर्भातील पदाधिकारी,तालुकाध्यक्ष यांच्या सभेदरम्यान त्यांनी भेट घेऊन ही आग्रही मागणी केली.
राळेगाव तालुक्यात उच्च प्रतीचा कापूस पिकतो मात्र इथे त्यावर प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळे बाजारभाव व इतर बाबतीत शेतकरी नाडवला जातो. त्या सोबतच बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असून इथे कोणताही मोठा उद्योग नाही. त्या साठी कापूस प्रक्रिया उद्योग व एम. आय. डी. सी ची मागणी करण्यात आली. या सोबतच पीकविम्याचा प्रश्न, नापिकी व कमी बाजारभाव, शेतकरी आत्महत्या या विविध समस्या बाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर ठोस आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली.
या वेळी राळेगाव शहरातील युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते राहुल वनस्कर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश घेतला. ना. अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष बाळूभाऊ धुमाळ यांच्या मार्गदर्शनात जनतेची कामे करून पक्ष बळकट करु अशी भावना राहुल वनस्कर यांनी व्यक्त केली.
बॉक्स 👇
दिलेला शब्द पाळणारा नेता ही ना. अजितदादा पवार यांची ओळख आहे. राळेगाव तालुक्यातील विविध प्रश्नाबाबत त्यांच्या सोबत चर्चा झाली. कापूस प्रक्रिया उद्योग इथे झाला पाहिजे तसेच बेरोजगारीवर मात करण्यासाठी एम. आय. डी. सी. तालुक्यात मंजूर करण्याचा मार्ग प्रशस्त करावा अशी आग्रही मागणी दादाकडे केली. यावर सकारात्मक भूमिका दादांनी दर्शवली. पक्ष पातळीवर संघटित प्रयत्न करा. जनतेची, गोर -गरिबांची कामे करा असा संदेश त्यांनी दिला. राहुल वनस्कर यांनी पक्षात प्रवेश घेतला असून त्यांच्या कडे युवकांचे मोठे संघटन आहे. पुढील काळात तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा भक्कम पर्याय म्हणून उभा राहील.