महापत्रकार परिषद नव्हे तर ड्रामा, इव्हेंट आणि हास्यजत्रा
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची शिंदे गटाकडून खिल्ली
मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देताना शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला होता. त्याविरोधात आज उद्धव ठाकरेंनी महापत्रकार परिषद बोलावत जनतेच्या न्यायालयामध्ये दाद मागितली. यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांसोबत असलेल्या कायदेतज्ज्ञांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन राज्यपालांवर घणाघाती टीका केली. दरम्यान, उद्धव ठाकरें यांच्या या महापत्रकार परिषदेवर आता शिवसेना शिंदे गटाचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. आजची महापत्रकार परिषद ही पत्रकार नव्हती तर तो एक इव्हेंट होता. त्यात ड्रामा इव्हेंट आणि हास्यजत्रा असं सारं काही होतं, अशी टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर टीका करताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आजची महापत्रकार परिषद ही पत्रकार परिषद नव्हती तर तो एक इव्हेंट होता. या इव्हेंटमध्ये काय होतं तर त्यात ड्रामा होता, अॅक्शन होती आणि हास्यजत्राही होती. वेगवेगळे महाभाग त्यामध्ये दाखवलेत. एखादी बाजू कशा पद्धतीने मांडली गेली पाहिजे ज्यामुळे ते लोकांना खरं वाटेल हा त्यामागचा उद्देश होता. मात्र याचं सार काढलं तर त्यात संजय राऊत जिंकले आणि उद्धव ठाकरे हरले असं म्हणता येईल, असा टोला शिरसाट यांनी लगावला.