21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

माणुसकीचा झरा गुरुवर्य प्रा.डाॅ.गणपत राठोड

माणुसकीचा झरा गुरुवर्य प्रा.डाॅ.गणपत राठोड

स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई येथील प्राचार्य डॉ. गणपत राठोड सेवानिवृत्त होत आहेत,ते फक्त प्राचार्यच नव्हे तर संशोधक मार्गदर्शक म्हणून पण त्यांनी काम केले त्यानिमित्त त्यांच्या कामाचा घेतलेला आढावा.
आपल्या आयुष्यामध्ये व्यक्ती खूप येत असतात आणि जात असतात पण काहीच व्यक्ती कायमच्या लक्षात राहतात ; नव्हे तर मनात कायमचं घर करून राहतात.ज्यांनी स्वतःच्या आयुष्या सोबतच दुसऱ्याच्या आयुष्याला महत्त्व दिलेलं असतं किंबहुना दुसऱ्याचं आयुष्य घडवण्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडलेली असते. अशा व्यक्ती कायमच्या स्मरणात राहतात हे तितकं सत्य आहे .प्राचार्य डॉ. गणपत राठोड हे एक असेच व्यक्तिमत्त्व . . .
मी डॉ. गणपत राठोड सरांना गेली 30- 31 वर्षापासून ओळखते . एम.ए.ला असताना सरांची ओळख झाली.सरांचा स्वभाव एकदम मन- मोकळा विद्यार्थ्यांमध्ये ते सहज मिसळून जातात. त्यांच्यामध्ये अहंभाव नाममात्रसुद्धा पाहायला मिळत नाही. कोणतीही समस्या सर सहजासह‌जी सोडवत. पुढे मी एम. फिल. झाल्यानंतर सरांकडे पीएच् . डी. चे मार्गदर्शन घेण्यासाठी गेले असता सरांनी तत्काळ मला पीएच् डी. ची विद्यार्थिनी म्हणून मान्यता दिली.संशोधनाच्या वेळी त्यांनी केलेले मार्गदर्शन हे तर माझ्या संशोधन कार्याला पूरक तर होतेच; पण त्याशिवाय या काळात त्यांच्याकडून झालेले माणुसकीचे दर्शन हे माझ्यासाठी फार अनमोल अशा स्वरूपाचे होते.
संघर्ष हा आयुष्याचा अविभाज्य भाग असतो ;पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तेच पुढे जातात ज्यांचे विचार सकारात्मक असतात आणि प्रतिकूल परिस्थितीविरुद्ध संघर्ष करण्याची तयारी असते . प्रा. डॉ राठोड सरांचा जीवनपट संघर्षमय राहिला आहे. औसा तालुक्यातील देवताळा या जन्मगावी राठोड सरांचे प्राथमिक शिक्षण झाले. पुढे माध्यमिक शिक्षण लातूर येथील यशवंत विद्यालयात झाले. वसतिगृहात राहून डॉ.सोमनाथ रोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्वर महविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आर्थिक अडचणीमुळे डॉ.गणपत राठोड सरांना सायकलवर पेपर वाटण्याचे सुद्धा काम करावे लागले.तसेच दिवसा कॉलेजचे शिक्षण व रात्री मिलवर रात्रपाळीचे काम करून त्यांनी जि‌द्दीने आप‌ले शिक्षण सुरू ठेवले . दयानंद महाविद्यालय ,लातूर येथे एम. ए. हिंदी या विषयात पूर्ण केले. सरांची जिद्द व धडपड पाहून प्रा. बिराजदार यांनी प्रौढ शिक्षण परीक्षक म्हणून काम मिळवून दिले त्यातून त्यांना 200/- प्रति महिना पगार मिळत असे. त्यातून त्यांचा राहण्याचा व पोटापाण्याचा प्रश्न मिटला. प्रा. डॉ. राठोड सरांनी हार मानली नाही व जिद्दीने त्यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला .संघर्ष वाट्याला आलेला आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा त्याला कडवी झुंज देऊन ते लढत राहिले .इतकेच काय तर –
“असे जगावे छाताडावरती
आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये
आयुष्याला द्यावे उत्तर ”
ही भूमिका घेऊन ते वावरत राहिले.म्हणूनच आयुष्याच्या प्रवासात यशाचे उत्तुंग शिखर गाठण्यात त्यांना कमालीचे यश लाभलेले आहे.
महाविद्यालयीन जीवनातच त्यांना विविध क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली व त्या संधीचंही त्यांनी सोनं केलं.वक्तृत्व व अभिनय याचे उपजत गुण त्यांच्या अंगी होते .दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी विविध स्पर्धेत भाग घेऊन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची अशी चाळीस प्रमाणपत्रे मिळवली आहेत.डॉ. सूर्यनारायण रणसुभे सरांचे प्रिय शिष्य बनून त्यांनी विविध नाटके उदा. ‘चकव्युह में फसा हिंदुस्तान’, ‘अध्यापक का बलिदान ‘आणि ‘खतरे ही खतरे’ या सारख्या एकांकीचे लिखाण करून स्वतः अभिनय करुन युवक महोत्सवात स्वत:च्या नावाची मोहर उमटवली . वेळप्रसंगी त्यांनी शिकवणी ही घेतल्या व परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न केला.
आई वडिल व गुरुजनांच्या कृपा आशीवदिने व स्वत:च्या हिंमतीने कसलीही निराशा न बाळगता शिक्षण पूर्ण केले. एम. ए. हिंदी या पदवीनंतर छत्रपती संभाजीनगर येथे एम.फिलचे शिक्षण बंधु रघुनाथ राठोड यांच्या मदतीने पूर्ण केले.त्यांच्या प्रेरणेनेच प्रा.डाॅ. राठोड सर हिंदीत्तर नवलेखक शिबिरासाठी मद्रासला (चेन्नई) गेले. एम. फिल.चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्राध्यापक या पदावर परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ महाविद्यालय येथे आपली सेवा दिली. त्यानंतर साडे तीन वर्षानी स्वामी रामानंद तीर्थ वरिष्ठ महाविद्यालयात हिंदी विभागात प्राचार्य श्री बी. के. सबनीस यांनी त्यांची निवड केली. हिंदी विभाग प्रमुख प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर दीड वर्षानी विभागप्रमुख म्हणून त्यांनी योगदान दिले. हिंदी विभागात काम करत असतानाच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणूनही त्यांनी बरीच वर्ष महाविद्यालयाची सेवा केली. मध्यंतरी यशवंतराव चव्हाण, महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्राचार्य म्हणून दोन वर्ष सेवा दिली;पण बरीच सेवा शिल्लक असल्यामुळे ते परत आपल्या स्वगृही म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई येथे परत आले.त्यानंतर योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश खुर्साले यांनी गणपत राठोड यांच्यावर प्रथम उपप्राचार्य म्हणून त्यानंतर प्रभारी पदाची जिम्मेदारी दिली. वेग-वेगळ्या टप्यात प्रा.डाॅ. गणपत राठोड सरांनी पाच वेळा प्राचार्य म्हणून योगदान दिले.35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर प्राध्यापक व प्राचार्य म्हणून सर सेवानिवृत्त होत आहेत.

प्रा.डॉ. गणपत राठोड सर ग्रामीण भागातील असूनही त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यासह सर्व भावंडावर शिक्षण व देशप्रेमाचे संस्कार केले. त्यांची सर्व भावंडे उच्चशिक्षित असून चांगल्या पदावर नोकरी करत आहेत, डॉ गणपत राठोड सर हिंदी साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. नाट्य व साहित्य क्षेत्रात सरांची अभिरुची आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी पीएच्.डी. संशोधनाव्यतिरिक्त दोन बृहद संशोधन प्रकल्प आणि दोन लघु संशोधन प्रकल्प पूर्ण केले. या व्यतिरिक्त त्यांनी आठ पुस्तके लिहिली असून आद्याप त्यांचे लेखन व संशोधन सुरुच आहे . त्यांनी लिहलेले कृषी क्रांतीचे प्रणेते मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे उत्तम चरित्र पुस्तक माजी कुलगुरु खा. जनार्दन वाघमारे यांचा हस्ते प्रकाशित झाले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी पीएच्.डी. झाले तर दहा विद्यार्थी एम. फिल झाले आहेत. चेन्नई, धारवाड, वेल्लोर, बिलासपूर, नागपूर, मुंबई, पुणे, अमरावती अशा ठिकाणच्या विद्यापीठातील संशोधन प्रबंध मूल्यांकन करण्याचे कार्य त्यांनी परीक्षक म्हणून केलेले आहे . राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तर कार्यक्रम अधिकारी म्हणून चांगले काम करीत त्यांनी महाविद्यालयास राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व मिळवून दिले.
चंद्रकांत पवार निर्मित संत सेवालाल चित्रपटात त्यांनी भीमानायक पात्राची भूमिका केली असून विद्यापीठ नामांतर चळवीत विद्यार्थीदशेत त्यांनी सहभाग घेतला असून कारागृहातही गेले आहेत. बंजारा समाजासाठी त्यांनी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर विविध कार्यक्रम घेतलेले असून 1985 ते 2018 मध्ये त्यांनी 58 कार्यक्रमाचे संयोजन केलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने समाज भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.तसेच सिमला (हिमाचल प्रदेश) येथील चाणक्य पुरस्कार, समता पुरस्कार नाशिक, बंजारा भूषण पुरस्कार पुसद, निर्भय समाजसेवक पुरस्कार उदगीर इत्यादी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

प्रा.डाॅ. गणपत राठोड सर एक ध्येयवादी तत्त्वनिष्ठ गुरू म्हणून मला लाभले. प्रामाणिकता व गुणवत्तेत त्यांनी कधी तडजोड केली नाही. अशा आदर्श व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते. आजच्या काळात अशा तत्त्वनिष्ठ, मनमिळावू प्राध्यापकांची नितांत आवश्यकता समाजाला आहे.आपुलकी , ममत्व,जिव्हाळा हे त्यांच्या स्वभावाचे स्थायीभाव. आलेल्या विद्यार्थ्याला कधीच परकेपणाची वागणूक त्यांनी दिली नाही. सदैव त्यांच्या स्वभावात माणुसकीचे दर्शन घडत होतं. माणुसकीचा झरा म्हणजेच प्रा डॉ गणपत राठोड असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही .

प्रा.डाॅ. राजश्री कल्याणकर

कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परळी वैजनाथ

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या