म्हणून मी शेतकरी पुत्र व मित्र सुद्धा आहे – बजरंग सोनवणे
आष्टी तालुक्यातील कॉर्नर सभेत घेतला विरोधकांचा समाचार
केज बीड / आष्टी :- मी एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलो. माझे वडील शेती करीत होते. मी सुद्धा वयाच्या चौदाव्या वर्षीपासून शेतातील पाळी पेरणीची कामे केली आहेत. म्हणून मी खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्र आहे. तर अवघ्या नऊ महिन्यात मी येडेश्वरी साखर उभा करून शेतकरी व बेरोजगारांची सेवा करीत आहे. म्हणून मी शेतकरी मित्र सुध्दा आहे. अशा शब्दात लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.
आष्टी तालुक्यातील हतोळण येथे आयोजित कॉर्नर सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे बोलत होते. यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, किशोर हंबर्डे, विधानसभा आष्टी विधानसभा प्रमुख रामभाऊ खाडे, परमेश्वर शेळके, आपचे डॉ. महेश नाथ, उद्धव दरेकर, काँग्रेसचे रवि ढोबळे, सचिन वारूळे, ऋषी दरेकर, डॉ. चौधरी, सचिन अरुण, बालासाहेब मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले कि ; ज्यांनी आपल्या वडिलांनी प्रचंड मेहनत घेवुन उभारलेला साखर कारखाना बंद पाडला. कामगारांना देशोधडीला लावले. त्यांना शेतकरी पुत्र व मित्र काय असतो हे कसे कळणार ? अशा शब्दात पंकजा मुंडे यांचे नाव न घेता समाचार घेतला. तर विद्यमान पालकमंत्र्यांनी चालवायला घेतलेला अंबा साखर कारखाना देखील बंद असल्याची टीका पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता करीत पन्नगेश्वरची देखील मुंडे कुटुंबीयांनी वाट लावली असल्याचा आरोप ही सोनवणे यांनी केला. त्यांनी शेतकरी व कामगार देशोधडीला लावले. ते शेतकरी, कामगार व जनतेचे खरे शत्रू आहेत. त्यांनी तीन कारखाने बंद केले, तर मी दोन कारखाने सुरू करून विक्रमी भाव दिला. अशी टीका भाजप व त्यांच्या मित्र पक्षावर केली.