राजकीय फायद्यासाठी त्यांनी माझ्या पतीचा बळी देऊ नये – मंजली कराड ( वाल्मिक कराड यांच्या पत्नी )
परळी – अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज मोठी घडामोड घडली. खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवरही आज मकोका दाखल करण्यात आला असून त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. यानंतर परळीत मात्र आंदोलन सुरू झाले असून कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. वाल्मिक कराडची ७५ वर्षांची आई आणि पत्नीही या ठिय्या आंदोलनात सहभागी आहेत. यावेळी त्याच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना, कराडवरील आरोप फेटाळून लावले. तसेच कराडचा वापर करणारे मंडळीच त्याच्यावर आरोप करत असल्याचे म्हटले.
कराडवर जे राजकीय नेते आरोप करत आहेत. तेच एकेकाळी कराडकडून मदत घेत होते. आज त्यांच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी माझ्या पतीचा बळी देऊ नये. आज आरोप करणाऱ्यांनी वाल्मिक कराडचा वापर करून घेतला. निवडून येण्यासाठी त्यांना माझ्या पतीचे सहकार्य पाहीजे होते. पण आज निवडून आल्यानंतर सत्तेत पद मिळविण्यासाठी माझ्या पतीचा बळी दिला जात आहे असेही त्या म्हणाल्या.
मंजली कराड पुढे म्हणाल्या कि मनोज जरांगे पाटील एकप्रकारचा समाजकंटक आहे. समाजात तेढ निर्माण करणारा समाजकंटकच असतो. त्यावर जीतावाद पसरविण्याचा गुन्हा दाखल केला पाहीजे. मराठा, मराठा काय करतो तो. मीही ९६ कुळी मराठा आहे. आमच्या महाराजांनी असे जातीवाद करण्यास शिकवले नव्हते. जात बघून खून किंवा गुन्हे होत नाहीत. जातीवादामध्ये माझ्या नवऱ्याचा हकनाक बळी दिला जात आहे. या प्रकरणाला भयानक जातीवादाचे वळण दिले जात आहे.
“सुरेश धस, संदीप क्षीरसागर हे या प्रकरणात राजकारण करत असल्याचा आरोप देखील उपस्थित महिलांनी केला आहे.