जागावाटपात शिंदे गटाची पंचाईत?
वृत्तसंस्था:
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाष्य केलं आहे. संजय गायकवाड म्हणाले, सरकारमध्ये एक नवा पक्ष आल्याने सत्तेचं विभाजन झालं आहे. काही खाती त्यांना (अजित पवार गट) मिळाली आहेत. ही वस्तूस्थिती असून आम्हाला ती मान्य आहे.
विधीमंडळाबाहेर आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी गायकवाड यांना प्रश्न विचारण्यात आला की, महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या प्रवेशाने शिंदे गटाची गोची झाल्याचं बोललं जात आहे. कारण, जागावाटपात शिंदे गटासमोर वेगवेगळी आव्हानं असणार आहेत. यावर काय सांगाल. या प्रश्नावर उत्तर देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, विधानसभेच्या जागावाटपाला अजून एक ते सव्वा वर्ष बाकी आहे. या गोष्टीला खूप वेळ आहे.
जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिंदे गटात याआधी तणाव निर्माण झाला होता. दोन महिन्यांपूर्वी (तेव्हा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हता) भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रवक्त्यांना आवाहन केलं होतं की, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २४० जागा लढवण्याचा भाजपाचा विचार आहे त्यामुळे तयारीला लागा. तेव्हा शिंदे गट आक्रमक झाला होता. तेव्हा आमदार संजय गायकवाड म्हणाले होते की, “शिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी १३० ते १४० जागा लढवणार आहोत. आमच्यापेक्षा तो पक्ष (भाजपा) मोठा असल्याने निश्चितपणे भाजपा जास्त जागा लढेल. पण आम्ही शिवसेना म्हणून १२५ पेक्षा कमी जागा लढणार नाही.