19 C
New York
Tuesday, September 17, 2024

Buy now

मोबाईल वापरण्याचे नियंत्रण कोणी ठेवावे?

मोबाईल वापरण्याचे नियंत्रण कोणी ठेवावे?
…………………………………………………………
एकीकडे महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार कमी होत नाहीत तर दुसरीकडे तीन महिन्यांमध्ये जानेवारी ते मार्च या महिन्यांमध्ये एकूण ५६१० महिला, तरुणी, मुली पळून गेल्या तर दररोज ७० मुली बेपत्ता होतात. यामध्ये १८ ते २५ वयाच्या मुली,महिला आणि तरुणी यांचे प्रमाण जास्त असून, हा पुरोगामी महाराष्ट्राला कलंक आहे.शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागात मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण अधिक आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेला एकलकोंडेपणा यामुळे माणसामाणसातील, कुटुंबातील संवाद कमी झाला आहे. कुटुंबातील संवाद कमी म्हणण्यापेक्षा संवादच होत नाही आणि कधी झालाच तर त्यातून चिडचिडेपणा अधिक दिसतो. याला जबाबदार आहे ते म्हणजे अधिक काळ आपण स्क्रीनवर घालवतो.
महाराष्ट्रातून महिला व मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण यावर्षात वाढलं आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त आहे. बहुतांश बेपत्ता मुली किंवा महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांच्या संपर्कात येऊन घर सोडून निघून गेल्या आहेत.आई- वडिलापेक्षा आभासी व्यक्ती प्रिय झाली आणि त्यातून मुली बेपत्ता होत आहेत. मोबाईल वापरण्यास घरातूनच परवानगी मिळाल्याने, मोबाईल वापरण्याचे नियंत्रण कोणी ठेवावे?हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. जर मुला – मुलींना मोबाईल वापरण्यास घरूनच पाठबळ मिळत असेल तर दुसरा व्यक्ती त्यांना मोबाईलचा वापर करण्यापासून परावृत्त करू शकत नाही.त्यामुळे एकूणच सामाजिक वातावरण अधिक तंत्रज्ञानाने व्यापले आहे. त्यातून मग, कोणीतरी जवळची व्यक्ती असावी वाटते आणि तोच कमजोरपणा भोवतो . मोबाईल वापरण्याचे नियंत्रण कोणी ठेवावे?कारण, कुणीतरी मित्र- मैत्रिणी असावी ज्याला काहीही शेअर करता येईल. यातून आभासी व्यक्ती जवळ वाटू लागते आणि मग एकमेकांचा सहवास हवा असतो यातून पळून जाण्याचा हा एकमेव मार्ग शोधला जातो.यात मुख्यतः अल्पवयीन मुली फसल्या जातात. कारण, तासनतास मोबाईल वर बोट फिरवत कधी कंटाळा येतो पण, मोबाईल हातातला टाकू वाटत नाही. आँनलाईन गेम खेळताना झालेली मैत्री फेसबुक, इन्स्टाग्राम, हळूहळू वाट्स अप पर्यंत जाते. गेम खेळून कंटाळा आल्याने ही अल्पवयीन मुलं एकमेकांना चॅटींग करत या चॅटिंग मधून एकमेकांना व्यक्तिगत विचारपूस करून, कॉलिंग पर्यंत येतात. तोपर्यंत यांच्याकडे पालकांनी कुटुंबातील सदस्यांनी लक्ष घालणं आवश्यक आहे. पण कामाच्या व्यापामध्ये आई-वडील किंवा घरातील जेष्ठ सदस्य हेच विसरतात आणि यामुळे एकमेकांचा निर्णय शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलेला असतो. आपल्या कुटुंबातील मुलं काय करत आहेत ऑनलाइन क्लासच्या भानगडीत भलतच काही करत तर नाही येत ना? याकडे लक्ष दिले पाहिजे. सामाजिक माध्यमांचा वापर वाढल्याने सामाजिक माध्यमातून दररोज एकमेकांच्या चॅटिंग मधून विश्वास निर्माण होऊन प्रेम होते. याच प्रेम प्रकरणातून मुलं – मुली पळून जाण्याचा प्रयत्न करतात. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवणं, लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेणं, मुलींना वाईट मार्गाला लावणं, नोकरीच आमिष दाखवून शोषण करणं अशा घटनांमुळे महिलांच्या, तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनलाय.
शिव- फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेले राज्य महिलांच्या सुरक्षेसाठी कुठे कमी पडतंय? छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांचा सन्मान केला त्याच महाराष्ट्रात मुली , महिलांवर अत्याचार होतायंत आणि मुली पळून जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. स्वातंत्र्य पूर्व काळात गरीब स्त्रियांच्या अब्रुला किंमत नव्हती, स्त्रीला फक्त उपभोग्य वस्तूच समजलं जायचं. रांझ्याच्या पाटलाने आपल्या पाटीलकीचा आव आणत अशाच एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीची अब्रू लुटली म्हणून छ. शिवाजी महाराजांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन विलंब न करता हात पाय तोडायची शिक्षा केली. कल्याणच्या सुभेदाराच्या सुंदर सुनेला सैनिकांनी हजर केले तेव्हा त्यांनी मातेचा दर्जा देऊन सन्मान केला. वस्त्र अलंकार देऊन रवाना केलं. बखरीमध्ये देखील या घटनेची नोंद आढळते. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की, ‘अशीच आमची आई असती सुंदर तर आम्हीही सुंदर झालो असतो ! ‘ स्त्रियांना आईचा दर्जा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सध्या वर्तमानपत्र उघडतात महिलांवरील अत्याचाराच्या घटना तसेच अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या बातम्यांनी रकानेच्या- रकाने भरून येतात.शिव -फुले – आंबेडकरांच्या नावाचा वापर केवळ राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी वापरला जात नाही ना? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

– पदमाकर उखळीकर ,
मो.९९७५१८८९१२ .

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या