भाषण आणि जनसंपर्कातून व्यक्तीमत्वातून विकास होतो-बालाजी जाधव
राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वक्तृत्व कला विकास शिबीरास मोठा प्रतिसाद
परळी/ प्रतिनिधी-
सार्वजनिक क्षेत्रात वावरत असतांना आपण कसा जनसंपर्क करतो, लोकांशी बोलतांना आपली देह बोली कशी असते हे अत्यंत महत्वाचे असून जनसंपर्क व भाषणकला आपल्या व्यक्तीमत्व विकासाला चालना देणारी असते. भाषण करणे म्हणजे केवळ व्यासपीठावर जावून माईक समोर उभे राहणे नसते तर आपल्या भाषणातून आवश्यक असलेला मुद्दा प्रकर्षाने मांडणे ही कला असते. भाषणबाजी ही एक कला असून त्यातील बारकावे जर अभ्यासले तर आपणही एक चांगले वक्ते म्हणून जगासमोर येऊ शकतो असेही बालाजी जाधव म्हणाले.
राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध वक्ते आणि भाषण कलेचे प्रशिक्षक बालाजी जाधव यांच्या वक्तृत्व कला विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संपादक चंदुलाल बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास बंसल क्लासेसचे प्रा.विष्णू घुगे, संतोष जायभाये, मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी, जयप्रकाश बियाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.
भाषणातून अनेकांनी आपले व्यक्तीमत्व विकसीत केले असून त्यांची जगात चांगली प्रतिष्ठा आहे. आज आपण भाषण शिकणार असून आपल्यालाही एक चांगला वक्ता म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याची संधी चंदुलाल बियाणी यांनी शिबीराच्या आयोजनातून करुन दिली असल्याचे प्रशिक्षक बालाजी जाधव यांनी सांगीतले. पहिल्या सत्रात भाषणासाठी कसे उभे रहावे, सभेमध्ये बोलतांना धिटपणा कसा असावा, मुद्दा कसा असावा, भाषणातील आवाजांचे चढ-उतार, भाषण करतांना हातवारे करणे म्हणजेच देहबोली कशी असावी अशा विविध विषयांवर बालाजी जाधव यांनी प्रशिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन केले. होय मी बोलू शकतो, जसे भाषण होईल तसे होऊ दे…पण मी बोलणार असे मनाशी ठासून सांगा आणि पुर्ण क्षमतेने व्यासपीठावर जा असा सल्ला बालाजी जाधव यांनी दिला. अनेकदा व्यासपीठावर जातांना मुळ मुद्दा भरकटतो, भाषणातील मुद्दे गायब होतात अशा वेळी स्मरणशक्ती चांगली ठेवा आणि जगाला जिंकण्यासाठी जिथे म्हणून संधी मिळेल तिथे भाषण करत जा असेही ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, नागरिक तसेच काही राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा साथीचे मुख्य व्यवस्थापक ओमप्रकाश बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संपादक प्रशांत जोशी, प्रकाश वर्मा, आनंद हडबे, आनंद तुपसमुद्रे, यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले
भाषण आणि जनसंपर्कातून व्यक्तीमत्वातून विकास होतो-बालाजी जाधव
https://atulyamaharashtra.com/