शब्दांच्या किमयागार
………………………………………………………………
कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनः स्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे. कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.त्या शब्दांना समृद्ध करणाऱ्या , शब्दांच्या किमयागार , आपल्या लिखाणातून विचार पेरणाऱ्या कवयित्री कल्याणी घुगे याचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने केलेला लेखप्रपंच. वाढदिवस अभिष्टचिंतन करताना त्यांनी केलेल्या लेखनाच्या प्रवासात वाढ व्हावी, जशी वयात वाढ होते.खर तर वय हा केवळ आकडा असावा.कारण,अगदी टीनएजरसोबत बोलताना कुणीतरी आपलं काय आता सहज बोलतो तर कुणी ऐंशी ओलांडली तरी चिरतरुण वाटतो.ते त्याच कार्य दाखवतो.म्हणजे तरुणांना लाजवेल असे. त्यामुळे वय ही केवळ संख्या असावी.अगदी साहित्यिक म्हटलं की, वयस्कर व्यक्ती असावी पण तरूण साहित्यिक असं सहसा म्हटलं जातं नाही.म्हणजे लिखाणापेक्षा त्यांच्या अनुभवाची चर्चा होते मग,तरुणांनी कितीही लिहीलं तरी ते एखाद्या वयापर्यंत येईपर्यंत साहित्यिक होतं नाहीत किंबहुना कोणी म्हटल्याचा आपवाद.
एखादी कल्पना मांडण्यासाठी किंवा काल्पनिक प्रतिमा सृष्टी उभी करण्यासाठी प्रतिभावंत लेखक कौशल्याने भाषेचा वापर करून साहित्य लिहितात. समाजाच्या सांस्कृतिक संचितामध्ये लेखकांच्या लिखाणाचा महत्त्वाचा वाटा असतो.पण साहित्यिक होण्यापेक्षा समाजातील विषमता लेखणीतून उतरली तर…! समाजातील प्रश्न, अन्याय आदी विषयांना वाचा फुटेल आणि ते प्रश्न राजकीय पटलावर येतील.अन्यथा यावर लिहिणार कोण?हा विडा आजच्या तरुण लेखकांनी उचलला तर परिवर्तन दूर नाही. महाराष्ट्र ही संतांची, महापुरुषांची भूमी आहे.त्यामुळे महापुरुषांचे विचार प्रत्येक व्यक्तीला कळणे अपेक्षित आहे. महापुरुषांच्या विचारांच्या दूरदृष्टीतून व्यक्तीचा ,कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा विकास होतो.परंतु,खरे विचार पेरण्यासाठी नवलेखकांनी पुढे आले पाहिजे.अशा नवलेखकांच्या यादीत कल्याणी घुगे नाव घ्यावे लागेल.संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून शब्दांचे महत्व विशद करतात.
‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥१॥ शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||२|| तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्दचि गौरव पूजा करु ॥३॥’
मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य आणि त्याच्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी सामाजिक संघर्ष करावा लागतो.समातील दारिद्र्य , महिलांवरील अन्याय याचं उत्कट भान त्यांच्या लेखनीत उमटत असत.समाजातील वेगवेगळ्या विषयावर लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकणाऱ्या नवलेखिका म्हणून परिवर्तन करण्यासाठी तसेच महापुरुषांच्या विचारांचा समाजात प्रसार करण्यासाठी त्यांच्या लेखणीचा प्रवास सुरू आहे. कधी लेखाच्या माध्यमातून तर कधी कवितेच्या कल्पनेतून वास्तविकता मांडण्याचं धाडस तर कधी चारोळीच्या माध्यमातून व्यक्त होणारे शब्द विचार करायला भाग पाडतात. कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे.कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. ‘घटस्थापना’ या त्यांच्या कवितेतून परिवर्तन आणि सद्यस्थितीला समाजात महिलांवर होत असलेला अन्याय दिसतो.कवितेत म्हणतात की,
देव्हाऱ्यात आईला
घरात स्थापित करून
घरातल्या आईला
घराबाहेर काढणारे
आई…! तुझी आज
घटस्थापना करणार
उमलत्या कळीची
भृणहत्या करून
उमलण्या आधीच
गर्भात खुडणारे
आई…!तुझी आज
घटस्थापना करणार
समाजातील वास्तवावर कविता लिहिणारे आताच्या कवींमध्ये बोटावर मोजण्याइतके कवी असतील किंवा गैरसमज ही असू शकेल! महाराष्ट्राच्या नवलेखिका कल्याणी क.घुगे यांना जन्मदिनी खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतितो.
– पदमाकर उखळीकर,
मो. ९९७५१८८९१२