कुपोषण आणि रक्तक्षयाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील अंगणवाड्यांना सरकारने सक्षम करावे : एमपीजे
प्रतिनिधी
परळी : महाराष्ट्रात अंगणवाडी केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे कुपोषण, रक्तक्षय यासारख्या गंभीर समस्यांना तोंड देण्यात अपयश येत आहे. कुपोषण, अशक्तपणा यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अंगणवाड्यांची विशेष भूमिका आहे. अंगणवाडी हे एक महत्त्वाचे सामुदायिक केंद्र आहे, जे महिला आणि मुलांना आवश्यक पोषण, आरोग्य आणि प्राथमिक शिक्षण सेवा प्रदान करते.
भारत सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक मुले व स्त्रिया अशक्तपणाने ग्रस्त आहेत, ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत समस्या निर्माण होतात. या समस्येला सामोरे जाण्यासाठी अंगणवाडी केंद्रांची महत्त्वाची भूमिका आहे, जे केवळ महिला आणि मुलांना आरोग्य सेवा पुरवत नाहीत तर त्यांना पोषण आणि प्राथमिक शिक्षण देखील देतात .
परंतु दुर्दैवाने महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्रांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात फार कमी असल्याने अनेक जण या सुविधेपासून वंचित असून त्यांना अत्यावश्यक सेवा मिळत नाहीत. विशेषत: कुपोषण आणि अशक्तपणाने ग्रस्त असलेल्या किशोरवयीन मुलींना अंगणवाड्यांकडून पूरक पोषण आहार देण्याची गरज आहे. याशिवाय अंगणवाडीतून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या सुविधांची योग्य माहिती नसल्याने लोक त्याच्या लाभापासूनही वंचित राहतात.
अंगणवाडीच्या समस्या सोडविण्या साठी देशातील सुप्रसिद्ध जनचळवळ “मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर (एमपीजे)” ने जुलै महिन्यात राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबवून अंगणवाडी केंद्रांच्या फायद्यांविषयी जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न केला.
लोकसंख्येनुसार अंगणवाडी केंद्र े सुरू करावीत आणि सर्व लोकांना अंगणवाडी सेवा मिळाव्यात, अशी विनंती एमपीजेने राज्य सरकारला केली आहे. त्याचबरोबर किशोरवयीन मुलींना नियमितपणे पूरक पोषण आहार देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
अंगणवाडी केंद्रांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि विशेषत: कुपोषण व रक्तक्षयग्रस्तांना या समस्येवर मात करण्यासाठी आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे एमपीजेच्या प्रवक्त्याने सांगितले. कुपोषण आणि रक्तक्षययासारख्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेने एकत्रितपणे अर्थपूर्ण पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे .
निवेदन देतांना एम पी जे जिल्हाध्यक्ष सय्यद सबाहत आली, उपाध्यक्ष सय्यद हिना वजाहत अली, परळी अध्यक्ष अब्दुल हफिझ, शेख मिनहाज, सय्यद अब्बास, सय्यद अहमद शेख अबुतलाह,शिरीन काकर ,बीबी मरियम, सय्यद तुबा ,नगमा मुनीर शेख आदी कार्यकर्ते हजर होते .