ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पण, ते खरे न्हवे…
ठाणे : वृत्तसंस्था
शुक्रवारी ठाण्यात पार पडलेल्या अशाच एका युतीच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवतरले आणि त्यांना पाहून सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला. पण, काही वेळातच ते मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे विकास महंत हे असल्याचे कळताच कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहावर आवर घालावा लागल्याचे चित्र दिसून आले.
ठाणे लोकसभा मतदार संघावर शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांकडून दावे करण्यात येत आहेत. यामुळे या जागेचा तिढा अद्याप सुटू शकलेला नसून या जागेवर कोण उमेदवार असेल, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याच्या व्यासपीठावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवतरले आणि त्यांना पाहून सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला. कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाने घोषणाबाजी केली. पण, काही वेळातच ते मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे विकास महंत हे असल्याचे कळताच कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहाला आवर घालावा लागल्याचे चित्र दिसून आले. या मेळाव्यात विकास यांनी मोदी यांच्या शैलीत भाषण केले.