“प्रकाश आंबेडकर निमंत्रणाची वाट बघतायत, सोबत यायचयं तर खरगेंना भेटा, अडचण काय?”
अमरावती – २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे ९ ठिकाणी काँग्रेसचे खासदार पडले आणि भाजपाचे निवडून आले हे वास्तव आहे. त्यामुळे असं काही प्रकाश आंबेडकरांनी करू नये. तुम्ही खरगेंना फोन केला तर तुम्हाला भेटायला कोण अडवणार आहे? तुम्ही कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहताय? असा थेट सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना विचारला आहे.
वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करण्याबाबत पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, इंडिया आघाडी ही २८ पक्षांची आहे. त्या पक्षांनी मल्लिकार्जुन खरगेंना नेतृत्व दिले आहे. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीतील नेत्यांना वैयक्तिक ओळखतात. जर त्यांना इंडिया आघाडीत यायचं असले तर त्यांनी खरगेंना भेटून सांगितले पाहिजे.एखादे पत्र दिले पाहिजे. पण ते कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहतायेत माहिती नाही. त्यांना मोदींना हरवायचं आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे प्रकाश आंबेडकरांनी पत्र लिहिले नाही. मी एक पत्र पाहिले जे त्यांच्या प्रवक्त्यांनी लिहिलं. स्वत: प्रकाश आंबेडकरांनी भेटायला काय हरकत आहे? ते नेते आहेत. २८ पक्षाचे नेते एकमेकांना भेटत आहेत. मग प्रकाश आंबेडकरांना भेटायला काय अडचण आहे? असं त्यांनी विचारले.