प्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकार गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
मुंबई : वृत्तसंस्था
नुकतीच ५८व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. प्रसिद्ध उर्दू कवी आणि गीतकार गुलजार आणि संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८व्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी गुलजार आणि संस्कृत पंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांच्या नावाची निवड करण्यात आल्याचे ज्ञानपीठ निवड समितीने नुकतेच जाहीर केले आहे.
१९४४मध्ये स्थापन झालेल्या भारतीय ज्ञानपीठाकडून भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार संस्कृत भाषेसाठी दुसऱ्यांदा आणि उर्दूसाठी पाचव्यांदा दिला जात आहे. सर्वोच्च साहित्यिक सन्मान असणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांना ११ लाख रुपयांचे पारितोषिक, वाग्देवीची मूर्ती आणि सन्मानपत्र दिले जाते
भारतीय साहित्यातील योगदानासाठी ज्ञानपीठ पुरस्कार
गुलजार यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दमदार लिखाणासाठी ओळखले जाते. तर, उर्दूतील उत्कृष्ट कवींमध्ये गुलजार यांचे नाव आवर्जून घेतले जाते. यापूर्वी, गुलजार यांना उर्दू साहित्य आणि हिंदी चित्रपटांमधील योगदानासाठी २००२मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४मध्ये पद्मभूषण आणि इतर पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते संपूर्ण सिंह कालरा ‘गुलजार’ या नावाने प्रसिद्ध आहेत. गुलजार हे हिंदी चित्रपटांचे गीतकार, कवी, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक, नाटककार आणि कवी आहेत. त्यांनी प्रामुख्याने हिंदी, उर्दू आणि पंजाबी भाषेत भरपूर साहित्य निर्मिती केली आहे. २००९मध्ये, डॅनी बॉयल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील गुलजार लिखित ‘जय हो’ गाण्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. या गाण्यासाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.