5.4 C
New York
Sunday, December 8, 2024

Buy now

पंकजाताईला निवडून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी – धनंजय मुंडे

पंकजाताईला निवडून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी – धनंजय मुंडे

परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून धनंजय मुंडेंसह कार्यकर्त्यांनी केला पंकजाताईंच्या विजयाचा संकल्प

परळी वैद्यनाथ – अमोल सुर्यवंशी

परळी शहरातील जनतेने नगर परिषदेच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक निवडणुकीत मला अभूतपूर्व प्रेम दिले. प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य देत विजय नोंदवले. माझ्या प्रत्येक संघर्षात माझा प्रत्येक सहकारी कार्यकर्ता माझ्या बरोबरीने लढला. आता तीच जबाबदारी पुन्हा या लोकसभा निवडणुकीत पार पाडायची आहे. या निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून पंकजाताईला निवडून देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन अधिकाधिक मताधिक्य देऊ, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ ना.धनंजय मुंडे हे मैदानात उतरले असून, बीड जिल्ह्यात आणि विशेष करून परळी मतदारसंघात त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे.

परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे मान्यवर नेते, आजी-माजी नगरसेवक, प्रभाग प्रमुख, बूथ प्रमुख, सर्व आघाडी व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रचार नियोजनार्थ महत्वाची बैठक पार पडली.

धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना लोकसभा व विधानसभा 2019 मधील बुथनिहाय मतांची आकडेवारीच सगळ्यांच्या समोर मांडली. बुथनिहाय सूक्ष्म नियोजन करून जास्तीत जास्त मते आपल्या उमेदवारास मिळावेत यासाठी पुढील आठवड्यापासून प्रभागनिहाय प्रचार फेरी व तत्सम प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरवात करण्यात येणार असल्याचेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

परळी वैद्यनाथ शहर विकासावर मतदान करते, इथे जाती-पातीचे किंवा अन्य राजकारण चालत नाही. आम्ही सदैव गरजूंच्या मदतीला तत्पर असतो. कोविड मध्ये तर आपण मदतीचा यज्ञ केला. त्यामुळे जनता आपल्या पाठीशी उभी राहिली व पुढेही कायम राहील, मात्र आपल्याला सर्वांपर्यंत पोचून आपले विकासाचे व्हिजन मांडायचे आहे व त्यातून मतदान रुपी आशीर्वाद मिळवायचा आहे, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, दीपक नाना देशमुख, सुरेश अण्णा टाक, शकील भाई कुरेशी,जयपाल लाहोटी, प्रा.विनोद जगतकर, सोफिया नंबरदार, सिराज भाई, शिल्पाताई मुंडे, सौ. संध्याताई सरोदे, पूजा ताई पांडे यांसह शहरातील आजी-माजी नगरसेवक, विविध आघाडी व फ्रंटल सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मुंडे यांनी तर प्रास्ताविक शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले. तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, दीपकनाना देशमुख, सुरेश अण्णा टाक, शकीलभाई कुरेशी, विनोद जगतकर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. सर्व कार्यकर्त्यानी एकजुटीने पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या