‘आता त्यांनी परत यायला हरकत नाही,’ अशोक चव्हाणांनी शिवसेनेला डिवचलं
नांदेड :
अजित पवारांना अर्थ खातं मिळाल्याने काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. अजित पवार अर्थमंत्री असल्याने त्यांनी आम्हाला निधी दिला नाही, असं कारण देउन जे लोक ठाकरेंना सोडून गेले, त्यांनी आता परत यायला हरकत नाही, अशी मिश्किल टीका अशोक चव्हाणांनी केलीये.
2 जुलैला अजित पवारांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर नुकतेच मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहिर केलंय, त्यामध्ये अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण आता त्यावरून राजकारण सुरु झालं आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हाती आयताच मुद्दा लागला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी याच मुद्यावरून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांना डिवचलंय.