21.6 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार – धनंजय मुंडे

पोकरा योजनेची व्याप्ती वाढविणार – धनंजय मुंडे
राज्यात आतापर्यंत 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा!
मराठवाडा वॉटर ग्रीड साठी सरकार प्रयत्नशील – धनंजय मुंडे

विधानपरिषदेत माहिती कृषी पासून गृह विभागापर्यंतच्या चर्चेला धनंजय मुंडेंचे उत्तर

मुंबई (दि. 25) – ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती केवळ निवडक गावांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक गावात लागू व्हावी, असे उद्दिष्ट आहे, भविष्यात यादृष्टीने आवश्यक निर्णय घेतले जातील. जास्तीत जास्त गावातील शेतकऱ्यापर्यंत या योजनेची व्याप्ती पसरावी, असा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नियम 260 अन्वये उपस्थित चर्चेच्या उत्तरात धनंजय मुंडे बोलत होते. आज सकाळीच माहिती घेतली असता, राज्यात या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत आजपर्यंत तब्बल 1 कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पिकविमा भरला असून, ही संख्या दररोज 6 ते 7 लाखांनी वाढत आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांना पीकविमा योजना अधिक सोयीची झाल्याचे स्पष्ट होते, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा संरक्षण मिळत आहे तर दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार मिळून वर्षाला 12 हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर देत आहे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांचा आर्थिक भार कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. विधानपरिषदेत विरोधीपक्ष नेत्यांसह विविध सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना धनंजय मुंडे यांनी पीएम किसान सन्मान योजनेतून बोगस पद्धतीने पैसे उचललेल्या खोट्या शेतकऱ्यांच्या विषयावर देखील मत व्यक्त केले. जो शेतकरी नाही, पण पैसे उचललेत अशा लोकांकडून केंद्र सरकार वसुली करत असल्याची माहिती मुंडेंनी दिली. दरम्यान सदस्यांनी उपस्थित केलेल्या पिक कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांच्या उर्वरित लाभाबाबत धनंजय मुंडे बोलताना म्हणाले की, पुरवणी मागण्यांमधून या रकमेची तरतूद करण्यात आली असून, 15 ऑगस्ट पर्यंत या रकमा वितरीत केल्या जातील. बोगस बियाण्यांच्या तक्रारींबाबत घोषित केल्याप्रमाणे कायद्याची निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू असून, कालच मंत्रिमंडळ उपसमितीची यासंदर्भात बैठक झाल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी 5 हजार गावांचा समावेश करण्यात येत असून, जलपातळी वाढण्यास नक्कीच याची मदत होईल. मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष संपावे, यादृष्टीने वॉटर ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे यांनी आजच्या चर्चेदरम्यान कृषी विभागासोबतच जलसंपदा, वित्त व नियोजन, मदत व पुनर्वसन, गृह आदी जवळपास 15 विभागाच्या चर्चेला राज्य सरकारच्या वतीने उत्तर दिले. अत्यंत अभ्यासपूर्ण तसेच व्यापक माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी सदनात मांडली.

https://atulyamaharashtra.com/

Related Articles

ताज्या बातम्या