वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन बुधवार, दि. 26 जुलै रोजी दिले. मणिपूर मधील हिंसाचार व महिलांची निर्वस्त्र धिंड काढली गेली ही घटना 4 मे रोजी घडली आहे. पिडीत हे कुकी समुदायाच्या आहेत. मैतेई समुदायाच्या जवळपास 800 जणांच्या जमावाने या कुटुंबावर हल्ला केला होता. त्यात या महिलेचा 19 वर्षांचा भाऊ आणि वडिलांची निघृण हत्या केली. त्यानंतर या दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढली. त्यातल्या 21 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार ही करण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीने अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या. दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, सदरील हिंसाचाराचे प्रकरण हे स्थानिकाच्या राजकीय दबावामुळे दडपून ठेवले गेले अखेर या प्रकरणाचा व्हिडीओ 19 जुलैपासून व्हायरल झाला. 21 जूनला गावच्या सरपंचानं याबाबत एफआयआर दाखल केली. पण त्यालाही एक महिना उलटूनही कुठे वाच्यता झाली नव्हती. आरोपींवर कारवाई होत नव्हती. अखेर या व्हिडीओनंतर संतप्त प्रतिक्रिया देशभरातून यायला लागल्या. त्यानंतर मणिपूर येथील जातीयवादी सरकारला जाग आली. राज्य आणि केंद्र सरकारची निष्क्रियता केवळ मणिपूरच्या लोकांसाठीच नाही तर देशातील सर्व नागरिकांसाठी वेदनादायक आहे, असे या मणिपूरच्या घटनेतून निदर्शनास येते. आम्ही उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारत सरकार यांना या निवेदनाद्वारे पुढील मागण्या केल्या आहेत. मणिपूर हिंसाचार घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांचा राजीनामा घेण्यात यावा, पिडीत कुटुंबातील वारसांचे पुनर्वसन करण्यात यावे, पिडीत कुटुंबातील वारसांना संरक्षण देण्यात यावे, मणिपूर हिंसाचार घटनेतील दोषी पोलिस अधिकार्यांवर सेवेतून बडतर्फीची कारवाई करण्यात यावी. ज्येष्ठ नेत्या सुधाताई जोगदंड, छाया हिरवे, पुष्पा बगाडे, भावना कांबळे (सोनवणे), सुषमा वाघमारे, सुनंदा शिंदे, संध्या शिंदे, स्वाती ठोके, रत्नमाला तरकसे, नंदाताई वारकरी, संगिता कांबळे आदींसह शंभर हुन अधिक महिलांच्या स्वाक्षर्या आहेत.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या आंदोलन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, अंबाजोगाई शहराध्यक्ष गोविंद मस्के यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
मणिपूर हिंसाचार प्रकरणी वंचित बहुजन महिला आघाडीचा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा
https://atulyamaharashtra.com/