घरकुलासाठी वसारी येथील फासेपारधी समाजाच्या १५ महिलांचा आत्मदहनाचा इशारा
वाशिम दि.22:(अजय ढवळे )
१६ फेब्रुवारी २०२२ चा शासन निर्णय तसेच ग्रामीण गृप निर्माण कार्यक्रमांतर्गत २२ ऑगष्टच्या शासन निर्णयानुसार अनेक वर्षापासून बेघर तसेच कच्च्या घरात राहणार्या मालेगाव तालुक्यातील ग्राम वसारी येथील फासेपारधी समाजातील पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरे मिळण्यासाठी १५ महिलांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात उज्वला शंकू पवार यांच्या पुढाकारात या महिलांनी २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसिलदार तसेच सर्वसंबंधीत विभागांना निवेदने दिली आहेत.
निवेदनाचा आशय असा की, फासेपारधी समाजातील या महिला आपल्या कुटुंबासह मौजे वसारी येथील सरकारी गावठाण शेत सर्व्हे नं. १३८ वर जमीनीवर कुडामातीचे घर /ताट्याचे घरे बांधुन राहत आहेत. घरकुल मिळण्यासाठी त्यांनी ७ ते ८ वर्षापासून उपविभागीय अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांना सतत निवेदने दिली आहेत. त्यांच्याकडे जागेचा नमुना १ ई ची नकलेचा सन १९९५-९७ चा शासकिय पुरावा आहे. तसेच आमच्याकडे जागेच्या दंडाच्या पावत्या आहे. तसेच त्यांच्याकडे ग्राम पंचायतचा सन २०११-२०१२ च्या कर भरलेल्या टॅक्स पावत्या आहेत. १६ फेब्रुवारी २०२२ चा शासन निर्णय असतांना सुध्दा ग्राम पंचायतने आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. ग्रामिण गृप निर्माण कार्यक्रमाअंतर्गत २२ ऑगष्टच्या शासन निर्णयानुसार प्रमाणे राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्य करणार्या पात्र लाभार्थ्यांना हक्काची घरे मिळाली पाहिजे असे नमूद केले आहे. मात्र वारंवार निवेदने देवूनही प्रशासनाकडून त्यांना अद्याप घरकुल मिळाले नसल्यामुळे या महिलांनी १२ ऑक्टोंबर २०१६ रोजी गटविकास अधिकारी मालेगाव यांना निवेदन देवून आत्मदहनाचा इशारा दिला होता. यावेळी गटविकास अधिकार्यांनी राहत्या ठिकाणी घरकुलाचे कोरडे आश्वासन देवून आमची दिशाभूल केल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. त्यानंतर या महिलांनी २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देवून घरकुलाची मागणी पुर्ण करा अन्यथा येत्या ९ जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे आत्मदहन करु असा इशारा या महिलांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.