अंबाजोगाईत नगर परिषदेच्या वतीने तहसील परिसर ते रविवार पेठ भागातील अतिक्रमणे काढण्यात आली.
अंबाजोगाई / प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील तहसील कार्यालय परिसर ते रविवार पेठ मुख्य रस्त्यालगतची अतिक्रमणे काढण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आली. प्रामुख्याने ही मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गुरुलिंगेश्वर स्वामी व नगरपरिषद अंबाजोगाई चे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गोविंद मुंडे व अंबाजोगाई न.प.चे स्वच्छता निरीक्षक तथा अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अनंत वेडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आले.
अंबाजोगाई शहरात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आ.नमिताताई मुंदडा यांच्या पाठपुराव्याने अंबाजोगाई शहरातील सर्व प्रमुख रस्ते व गावअंतर्गत रस्ते तसेच गल्लीतील सर्व रस्ते हे सिमेंट काँक्रीटद्वारे मजबूत करण्यात येत आहेत.गावअंतर्गत प्रमुख रस्ते हे नगरपरिषद हद्दीत असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यावर राजकीय हितसंबंधांमुळे अतिक्रमणे बसवण्यात आली होती. मात्र शहरातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आल्याने सर्व रस्ते हे मजबूत आणि चकाचक बनवले जात आहेत. त्या अनुषंगाने तहसील कार्यालय परिसर ते रविवार पेठ भागातील हा प्रमुख रस्ता दोन्ही बाजूनी अतिक्रमणधारकांनी वेढलेला होता. पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे जिकिरीचे बनले होते. रविवार पेठ भागातून महिला व मुलींना नाक दाबूनच चालावे लागत होते.शिवाय अतिक्रमण धारक हे कोणालाही जुमानत नव्हते.मनमानीपणा करून सामान्य माणसाला वेठीस धरून त्याचा त्रास होतोय का? याचा विचार न करता अतिक्रमणे करण्यात येत होती. गेल्या अनेक वर्षापासून ही अतिक्रमणे राजकीय हित संबंधामुळे काढली जात नव्हती. ही अतिक्रमणे केवळ एका पक्षाची किंवा एका नेत्याची नव्हती तर सर्वच पक्ष आणि नेते यांची होती.या सर्व नेत्यांचा त्यांना आशीर्वाद होता म्हणून नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्ते विकासाच्या कामात राजकीय हस्तक्षेप खपवून न घेता सर्वांचीच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गुरु लिंगेश्वर स्वामी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. उत्कर्ष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक तथा अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अनंत वेडे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता गोविंद मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. यावेळी मोठा फौजफाटा, पोलीस बंदोबस्त आणि संपूर्ण यंत्रणा एकत्र करून ही अतिक्रमणे काढण्यात आली. आजवर हे रस्ते कधीही श्वास घेत नव्हते मात्र हे रस्ते मोकळे झाले असून अंबाजोगाईकरांना व वाहतुकीसाठी हे रस्ते मोठे होत आहेत. रस्ते विकासाच्या कामात कोणीही अडथळा निर्माण करू नये असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.उत्कर्ष गुट्टे यांनी केले आहे.