मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा
*मूकनायक पुरस्कारांची घोषणा; पत्रकारांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वाटप*
परळी,(प्रतिनिधी):- पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून अनेक अडचणी आणि संघर्षाला तोंड देत पत्रकार आपली बातमीदारी करतो. त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आयुष्यमान भारत कार्ड योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर दर्पण दिनाच्या निमित्ताने मराठी पत्रकार परिषद मुंबई शाखा परळी व परळी शहर व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात “मूकनायक ” पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे दि.6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वा. दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पहिल्या महिला संपादिका तानुबाई बिर्जे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सुमारे 27 पत्रकार बांधवांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक रानबा गायकवाड तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार प्रवीण फुटके यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे परळी तालुका समन्वयक ज्येष्ठ संपादक आत्मलिंग शेट्टे, जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे, मराठी पत्रकार परिषदेचे परळी तालुका समन्वयक धनंजय आरबुने, मूकनायक पुरस्कार संयोजन समितीचे इंजि.पत्रकार भगवान साकसमुद्रे, संपादक बालकिशन सोनी, संपादक बालासाहेब फड, संपादक भगीरथ बद्दर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक जगदीश शिंदे, डिजिटल मीडिया परिषदेचे परळी तालुका अध्यक्ष नितीन ढाकणे, अमोल सूर्यवंशी, लोकमत समाचारचे पत्रकार सय्यद अफसर यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, प्राध्यापक प्रवीण फुटके यांनी आपले विचार व्यक्त केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस म्हणाले की, समाजात अनेक वेगवेगळ्या वृत्ती आणि प्रवृत्तीची माणसं असतात. अनेक जण दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला हेतू साध्य करीत असतात. पत्रकार आणि पोलीस यांच्या प्रत्येक कृतीवर लोकांची बारीक नजर असते त्यामुळे पत्रकारांनीही सजग वृत्तीने आपले काम केले. मराठी पत्रकार परिषद व परळी पत्रकार संघाच्या वतीने दर्पन दिनी पत्रकारांसाठी आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वितरण करण्यात आले ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय आरबुने तर सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नितीन ढाकणे यांनी मानले.
@@@@@@@@@@#
*मूकनायक पुरस्कारांची घोषणा*
मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या दर्पण दिन व आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड वितरण कार्यक्रमात यंदाच्या मूकनायक पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यात जीवन गौरव पुरस्कार साहित्यीक पत्रकार रानबा गायकवाड( दै.सम्राट), उत्कृष्ट जेष्ठ संपादक पुरस्कार राजेश साबणे ( दै. परळी प्रहार), उत्कृष्ट संस्कृतिक वार्ता पुरस्कार प्रा.रवी जोशी ( दै.पुढारी), रिपोर्टर ऑफ द इयर पुरस्कार धनंजय आरबुने ( दै.पुण्यनगरी), उत्कृष्ट शोध वार्ता पुरस्कार प्रा. प्रवीण फुटके ( दै.सकाळ), उत्कृष्ट सामाजिक वार्ता पुरस्कार जगदीश शिंदे ( दै. गांवकरी, संकेत), तर उत्कृष्ट युवा संपादक पुरस्कार नितीन ढाकणे (दै.अतुल्य महाराष्ट्र) यांना जाहीर करण्यात आला. शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व प्रत्येकी 1 हजार रुपये रोख असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. मूकनायक दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीचे इंजि. भगवान साकसमुद्रे यांनी दिली.