निर्भीड पत्रकारांमुळे लोकशाही जिवंत आहे – रानबा गायकवाड
सोनपेठ (प्रतिनिधी)
निर्भीड आणि सत्य परखडपणे मांडणाऱ्या पत्रकारामुळे लोकशाही जिवंत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक गायकवाड यांनी केले. ते दर्पण दिनानिमित्त कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात प्रमुख मार्गदर्शक व व्याख्यान प्रसंगी बोलत होते. महाविद्यालयाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळ्याचे उद्घाटन हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाकडून ‘दर्पण दिना’निमित्त ‘पत्रकारांचा सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम तर या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड होते. यावेळी मंचावर पत्रकार शिवमल्हार वाघे, सुभाष सावंत, किरण स्वामी, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील हे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा पुढारीच झाले पाहिजे असे काही नाही.समाजाचे प्रश्न आपल्या लेखनीच्या माध्यमातून सुध्दा सोडवले जाऊ शकतात.तशी दृष्टी मात्र पत्रकारांकडे पाहिजे.देशात पत्रकारांची कशी गळचेपी होत आहे यावरही त्यांनी भाष्य केले.तर अध्यक्षीय भाषणात परमेश्वर कदम यांनी सोनपेठचे पत्रकार कुणाच्याही दबावाखाली काम करीत नाहीत ते सामाजिक कार्यात पुढे असतात असे सांगितले.याप्रसंगी सा. सोनपेठ दर्शनच्या विशेष अंकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, नुकत्याच संपन्न झालेल्या ‘आव्हान – २०२३’ मधील सहभागी महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सखाराम कदम यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसंत सातपुते मांडले. तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बालासाहेब काळे यांनी मानले. यावेळी सर्व पत्रकार बांधव, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने झाली.